esakal | हिंगोलीत 'लिगो प्रकल्पा' च्या मुख्य इमारतीच्या कामास सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली : औंढा तालुक्यातील दुधाळा, अंजनवाडा या भागात गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणारी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे.

हिंगोलीत 'लिगो प्रकल्पा' च्या मुख्य इमारतीच्या कामास सुरुवात

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा (Aundha Nagnath) तालुक्यातील दुधाळा, अंजनवाडा या भागात गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणारी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. मात्र कोरोनाप्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून कामकाज ठप्प पडले होते. मात्र दुसरी लाट कमी होताच मुख्य इमारतीच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती प्रकल्पाचे अभियंता सागर भुवड यांनी दिली. अणुऊर्जा विभागाच्या वतीने औंढा तालुक्यातील दुधाळा अंजनवाडा, गांगलवाडी आदी परिसरात गुरुत्वाकर्षण लहरींचा (Hingoli) अभ्यास व जागतिक दर्जाचा प्रात्यक्षिक भौतिकशास्त्र या विषयावरील अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिसरी, तर भारतातील पहिली प्रयोगशाळा लिगो इंडिया प्रकल्प (Ligo India Project) उभारणार आहे. यासाठी वन जमीन, खासगी आणि सरकारी जमीन अशी मिळून जवळपास १७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून सरकारी चाळीस हेक्टरचा ताबा ही देण्यात आला आहे. खाजगी जमीनधारकांना त्यांच्या जमिनीचा मावेजा ही देण्यात आला आहे. या ठिकाणी मागील वर्षी शास्त्रज्ञांनी येऊन पाहणी केली. तर काही ठिकाणी बोअर करून मातीचे सॅम्पल ही घेतले होते. मात्र दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भाव पसरल्याने कामे ठप्प पडली होती.

हेही वाचा: दुष्काळी शेतीला ‘ड्रॅगन फ्रूट’चे वरदान, कोणत्याही कीडरोगावर मात

तसेच लिंबाळा एमआयडीसी परिसरात असलेल्या जामवाडी शिवारातील ७.८० हेक्टर जमिनीवर वैज्ञानिक व शास्त्रज्ञ यांच्यासाठी निवासस्थान उभारले जाणार असून ही जमीन देखील लिगो इंडिया प्रकल्पाला शासनाने काही अटी व शर्तीवर शासकीय गायरान जमीन महसूल संहिता कलम व तरतुदीनुसार भोगवटा मूल्य आकारून ऊर्जा विभागास हस्तांतरित करून दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी या ठिकाणी देखील निवासस्थान बांधकामाच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. लिगो प्रकल्पाची कामे झाल्यास स्थानिकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र मागील दीड वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने लिगो प्रकल्पाचे कामकाज देखील ठप्प पडले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट देखील ओसरल्याने लिगो प्रकल्पाच्या मुख्य इमारतीचे काम सुरू करण्यात आले असून खासगी जमीन ताब्यात घेतलेल्या ठिकाणी तार कुंपणचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: सासरच्या मंडळींनी डॉक्टर असलेल्या सुनेला जबरदस्तीने पाजले विष

आता हळूहळू बाजारपेठ सुरू झाल्याने आर्थिक उलाढाल होत आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट कोसळले, तर काही जणांच्या कामावर गदा आल्याने पोटा पाण्याचा ही प्रश्न निर्माण होऊन सर्व कारभार विस्कळीत झाला आहे. त्यातच लिगो प्रकल्पाला देखील कोरोनाचा फटका बसला आहे. आता कामाला सुरुवात झाली आहे. तर नांदेड येथील वसरणी परिसरात आठ एकर जागा लिगो प्रकल्पाने खरेदी केली असून या ठिकाणी जागतिक दर्जाचे वैज्ञानिकांसाठी विश्रामगृह देखील उभारले जाणार असल्याचे सागर भुवड यांनी सांगितले.

loading image
go to top