esakal | लॉकडाउन : कळमनुरीमध्ये सर्वत्र शुकशुकाट, रिकामटेकड्यांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या ११ दुचाकी चालकांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

लॉकडाउन : कळमनुरीमध्ये सर्वत्र शुकशुकाट, रिकामटेकड्यांवर कारवाई

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : जिल्ह्याभरात गुरुवार (ता. सहा) पासून करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये कळमनुरी शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मुख्य बाजारपेठ व शहरात शुकशुकाट निर्माण झाला होता. लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या ११ दुचाकी चालकांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. माळेगाव (फाटा) येथील एका हॉटेल चालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी याला मोठा प्रतिसाद दिला आहे. बंदमुळे शहरातील सर्व व्यापार बाजारपेठेतील व्यवहार बंद असल्यामुळे शहरांमध्ये सर्वच भागांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन व्हावे याकरिता पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. जी. रोयलावार, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील चौक बाजार, नवीन बस स्थानक, जुना बस स्थानक या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा माणुसकीचा ओलावा आटला : चक्क मुख्याधिकाऱ्यांनी दिला, वृध्देच्या प्रेताला खांदा

माळेगाव फाटा येथील व्यापाऱ्यावर गुन्हा 

दरम्यान बंदचे उल्लंघन करणाऱ्या व शहरात विनाकारण मोटरसायकल घेऊन फिरणाऱ्या अकरा मोटरसायकल स्वारांना पोलीस पथकाने ताब्यात घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून चार हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे. तर माळेगाव येथे हॉटेल उघडून व्यवसाय करणाऱ्या एका हॉटेल मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करु

बंद दरम्यान कुठलेही कारण नसताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री भोईटे यांनी सांगितले आहे. तर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बंदला विरोध करणाऱ्या वंचित आघाडीच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती देत पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना ई- पास परवानगी असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचेही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे