Loksabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्यात युतीचे आव्हान

Loksabha 2019 :  काँग्रेसच्या बालेकिल्यात युतीचे आव्हान

मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली हे दोन मतदारसंघ काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमुळे ओळखले जातात. नांदेड म्हटले की, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचे, तर हिंगोली म्हटले की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टिममध्ये महत्त्वाची भूमिका असलेले राजीव सातव यांचे नाव येते. या दोघांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रताप पाटील चिखलकरांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसच्या दोन-तीन याद्या जाहीर झाल्यानंतरही नांदेड आणि हिंगोलीचा निर्णय जाहीर झालेला नव्हता. अखेर नांदेडमधून अशोक चव्हाणांचे नाव पुढे आले; तर हिंगोलीतून शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना मैदानात उतरवण्यात आले. हिंगोलीमधून सातव यांची उमेदवारी बदलण्यामागे त्यांना गुजरातमधील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात चव्हाण समर्थक आणि सातव समर्थक यांच्यामध्ये काही महिन्यांपासून कटुता निर्माण झाली आहे. अर्थात सातव यांनी केवळ त्या कारणासाठीच उमेदवारी केली नाही, असेही म्हणता येत नाही. शिवसेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे हिंगोलीच्या काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. हिंगोलीतून भाजपचे नेते ॲड. शिवाजी जाधव यांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल? हे सांगता येणार नाही. अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकर यांच्यासोबत बहुजन वंचित आघाडीचे यशपाल भिंगे यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. 

धनगर समाजाची मते निर्णायक
औरंगाबाद आणि नांदेडमध्ये बहुजन वंचित आघाडी आश्‍चर्यकारक कामगिरी करणार असे दावे केले जात आहेत. बहुजन वंचित आघाडी व्यतिरीक्त प्रमुख राजकीय पक्षांनी राज्यभरात धनगर समाजाचा एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील धनगर समाजाच्या प्रमुखांची औरंगाबादला बैठक झाली. बैठकीला राजकीय नेत्यांसोबत काही निवृत्त सनदी अधिकारी आणि सामाजिक कामात असलेल्या मान्यवरांचाही समावेश होता. त्या बैठकीत धनगर समाजाने किमान आठ ते दहा ठिकाणी एकगठ्ठा मतदान करून आपली ताकद दाखविण्याचा निर्धार केला. नांदेड मतदारसंघात हा पॅटर्न चालला, तर या वेळी निवडणूक मोठी रंजक होईल, अशी शक्‍यता आहे. हिंगोलीतील जागा राखण्याची जबाबदारी आता सर्वस्वी राजीव सातव यांच्यावर येऊन पडली आहे. हिंगोलीत अटीतटीची लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. 

बांधणी की प्रभाव
परभणी लोकसभा मतदारसंघ औरंगाबादनंतर शिवसेनेचा महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना शिवसेनेसमोर उभे केले. शिवसेनेचे संजय जाधव आणि राजेश विटेकर यांच्या लढाईत मेघना बोर्डीकर यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बोर्डीकर संजय जाधव यांच्या मार्गात अडथळा आणणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ग्रामीण भागातील प्रभाव या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. 

अस्तित्वाची लढत
एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणारा लातूर लोकसभा मतदारसंघ गेल्या वेळी मोदी लाटेत भाजपने काबीज केला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुचवलेल्या सुधाकर श्रृंगारे यांना भाजपने उमेदवारी दिली. मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही शेजारच्या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीने त्यांच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली. खासदार सुनील गायकवाड यांच्याऐवजी सुधाकर श्रृंगारे मैदानात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाकडून अनेकांनी तयारी दर्शविली होती. अखेरीस मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने लढाईला सुरवात केली आहे. या दोन उमेदवारांपेक्षा लातूरची लढाई पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरद्ध काँग्रेसचे नेते शिवाजी पाटील निलंगेकर, अमित देशमुख यांच्यातील चुरस मानली जाते. काँग्रेसकडून सातत्याने जिंकत आलेले शिवराज पाटील चाकूरकर या निवडणुकीत किती सक्रिय राहतात, यावरही बरेच अवलंबून आहे. मराठवाड्यातील काँग्रेसची बलस्थाने असलेल्या लातूर, नांदेड आणि हिंगोलीत त्यांचे विरोधी असलेली शिवसेना-भाजप युती चांगलेच डोके वर काढत आहे, हेच यावरून लक्षात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com