केवळ जिंतूर तालुक्यात ३३ हजार ४०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान

halad
halad

जिंतूर ः जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिंतूर तालुक्यात ४० हजार ११२ शेतकऱ्यांच्या ३३ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रात ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. यात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना सर्वाधिक फटका बसला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनाने २३ कोटी १० लाख ६५ हजार रुपये निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. 

तालुक्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षीच्या खरिप हंगामात शेतकऱ्यांनी एक लाख तीन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या प्रमुख पिकांसह इतर पिकांची पेरणी केली होती. परंतू, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सतत २०-२२ दिवस पडलेल्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील मूग, उडीद पिकांचे आतोनात नुकसान झाले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी व पूरामुळे हाती आलेल्या सोयाबीन, कापूस यासह सर्वच खरिप पिकांना मोठा फटका बसला. 

महसूल, पंचायत व कृषि विभागातर्फे पीक नुकसानीचे पंचनामे 
याबाबत महसूल, पंचायत व कृषि विभागातर्फे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. महसूल विभागाकडील प्राप्त माहितीनुसार जून ते सप्टेंबर महिन्यात ५३ गावातील सहा हजार ६२८ शेतकऱ्यांचे पाच हजार १९७.१ हेक्टरवरील आणि ऑक्टोबर महिन्यात ५९ गावातील ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांच्या २८ हजार ७७० हेक्टर क्षेत्रातील जिरायती व फळबागांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळून आले. यामध्ये सोयाबीन २० हजार ४९६.६१,१२ हजार १९५.४५ आणि तूर एक हजार २६६.६५ हेक्टरवर या पिकांचे नुकसान झाले. 
 

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको करणार - श्रीनिवास मुंडे 
गंगाखेड ः तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे (ता.दोन) रोजी निवेदनाद्वारे दिली. यावर्षी परतीच्या पावसाने गंगाखेड तालुक्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे राणीसावरगाव मंडळ व गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. ओला दुष्काळ व पिक विमा मंजूर करण्यासाठी तालुक्यातील राणीसावरगाव येथे (ता.दहा) रोजी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. 
 
शेतकरी संघर्ष समितीचा आज रास्तारोको 
परभणी ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता.चार) परभणीकडे येणाऱ्या पोखर्णी फाटा, पेडगाव फाटा, त्रिधारा फाटा व टाकळी कुंभकर्ण या मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे. परभणी जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना सरासरी पंचनामे ग्राह्य धरून विमा मंजूर करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सीसीआयचे किमान दोन खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन तत्काळ सुरू करावे, या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती बुधवारी विविध चार ठिकाणी रास्तारोको आंदोलन करणार आहे. परभणी शहरात येणाऱ्या पोखर्णी फाटा, पेडगाव फाटा, त्रिधारा फाटा व टाकळी कुंभकर्ण या मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे नमुद केले आहे. 

शेतकऱ्यांचे वैयक्तिक सिंचन विहिरीचे कुशल बिल द्या 
चारठाणा ः जिंतुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे एमआरईजीएसच्या वैयक्तिक लाभाच्या अहिल्याबाई होळकर सिंचन विहिरीचे कुशल बिल न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उसने पैसे घेऊन खोदकाम झालेल्या विहीरीचे बांधकामही पुर्ण केले. मात्र, त्यांना मागील वर्षभरापासून कुशल बिल न मिळाल्याने व सध्या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने व सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन वेळेवर परतफेड न झाल्यामुळे सावकार घरी चकरा मारत असल्याने शेतकरी चितांग्रस्त आहे. शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेता कुशल बिल अदा करण्यासाठी तहसीलदारांनी त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी नसता मी शेतकऱ्यांसोबत (ता.नऊ) रोजी सोमवारी लोकशाही मार्गाने एकदिवसीय धरणे आंदोलन करेल अशा इशारा जिल्हा परिषद सदस्या मीनाताई राऊत यांनी (ता.तीन) रोजी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला. निवेदनावर राष्टवादी ओबीसी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत यांच्यासह तालुक्यातील सिंचन विहिरीचे लाभार्थी मनोज रोकडे, तारेक देशमुख, सईद काझी, इस्राईल कुरेशी, अशोक चव्हाण, उद्धव चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com