गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

shinde.jpg
shinde.jpg


फुलवळ, (ता.कंधार, जि.नांदेड) ः तालुक्यातील फुलवळसह परिसरातील भागात सोमवारी (ता. सहा) सायंकाळी जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून योग्य तो मोबदला द्यावा, अशा मागणी त्यासंदर्भात मंगळवारी (ता. सात) कंधार-लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे, कंधारचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, कंधार तालुका कृषी अधिकारी रमेशराव देशमुख यांच्या पथकाने फुलवळ, कंधारेवाडी, पानशेवडी भागातील गारपीटबाधित क्षेत्रातील पिकांची पाहणी केली आणि लवकरच पंचनामे करून योग्य न्याय दिला जाईल, असा विश्वास दिला.

मंगळवारी (ता. सात) एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता फुलवळसह परिसरातील गारपिटीमुळे बाधित क्षेत्रातील पिकांची पाहणी करण्यासाठी शासन आणि प्रशासन दौरा आला. त्यात आमदार श्यामसुंदर शिंदे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, तालुका कृषी अधिकारी रमेशराव देशमुख, मंडळ कृषी अधिकारी एन. बी. आंबुलगेकर, कृषी पर्यवेक्षक एस. ए. डावळे, कृषी सहायक गंगाधर खाडे, मंडळ अधिकारी शिवदास पटणे, तलाठी कीर्ती रावळे, कृषी सेविका कल्पना जाधव, तलाठी मेत्तलवाड आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता.


योग्य तो न्याय दिला जाईल
या पाहणी दौऱ्यात फुलवळ, कंधारेवाडी, पानशेवडी येथील गहू, ज्वारी, हळद, भुईमूग, मक्का यासह रब्बी हंगामातील विविध नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तसेच गारपिटीने बाधित क्षेत्रातील उभ्या पिकांचे, फळबागेचे, भाजीपाला शेतीचे स्थळ पंचनामे करण्यासाठी लवकरच महसूल विभाग व कृषी विभागाकडून एका टीममार्फत केले जातील आणि प्रत्यक्ष खरोखरच ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल, असे आमदार श्यामसुंदर शिंदे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, तालुका कृषी अधिकारी रमेशराव देशमुख यांनी सांगितले. या वेळी सरपंच बालाजी देवकांबळे, रामराव मंगनाळे, धोंडिबा मंगनाळे, बाबूराव आमलापुरे, मधुकर डांगे, नागोराव केंद्रे, नवनाथ केंद्रे, राम जक्कलवाड, राजू कंधारे, रमेश मोरे, गोविंद मोरे, तुकाराम मोरे, सुधाकर मोरे, बाळू गर्जे, योगेश नंदनवनकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

न्याय देण्याची शेतकऱ्यांची विनवणी
अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना झालेल्या नुकसानीचा पाढाच वाचला आणि आम्हा शेतकऱ्यांचे आता तुम्हीच माय-बाप आहात साहेब, त्याकरिता आमच्या पिकांचे झालेले नुकसान पाहता पार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तेंव्हा आपणच आम्हाला न्याय द्यावा, अशी विनवणीही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com