हिंगोलीत सोयाबीनचे ६२५ कोटी रुपयांचे नुकसान

मंगेश शेवाळकर
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

हिंगोली : जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार एकट्या सोयाबीन पिकाचे तब्बल ६२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे अन् पीकविमा मंजुरीकडे लागले आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाला कोंबे फुटली आहेत. शेतात सुडी करुन झाकलेले सोयाबीन देखील पाण्याखाली सापडले आहे.

कृषी विभागाच्या नजर पाहणीनुसार जिल्ह्यामध्ये दोन लाख तेरा हजार ७२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे एक लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सरासरी १२ क्विंटल एवढी आहे. नुकसानीचा अंदाज व उत्पादकता पाहता जिल्ह्यात सुमारे सोळा लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे नुकसान झाले आहे. सध्याचा बाजार भाव तीन हजार सातशे रुपये प्रती क्विंटल लक्षात घेता सोयाबीनचे तब्बल ६२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्या कृषी, महसूल व पंचायत विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरु असून यामध्ये नेमके किती क्षेत्राचे व किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. या नुकसानीनंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या  शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची तसेच पीकविमा मिळण्याची आस लागली आहे.

जिल्ह्यात अद्यापही शेतांमधून वाफसा नसल्याने रब्बी पिकांची पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ता. सात नोव्हेंबरपर्यंतच हरभरा पीक घेता येते. मात्र, आता पेरणीला उशीर होत असल्याने हरभरा पिकाचेही उतारा घटणार असल्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.

कापूस, ज्वारी, तूर पिकांचेही नुकसान
जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ, कापूस, ज्वारी, तूर पिकांचेही नुकसान झाले असून पालेभाज्यांनाही फटका बसला आहे. जास्त पाण्यामुळे तुरीचे पीक वाळून जात आहे.  

शासनाने सरसगट मदत द्यावी
शासनाने पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता सरसकट मदत जाहीर केली पाहिजे. याशिवाय पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळवून दिला पाहिजे. शासनाकडून मदत मिळाली तरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणे शक्य होणार असल्याचे मत शेतकरी संतोष पाखरे यांनी व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of Rs 2 crore of soybean in Hingoli