Parbhani : ‘लम्पी’ला रोखण्यासाठी लसीकरणावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lumpy

Parbhani : ‘लम्पी’ला रोखण्यासाठी लसीकरणावर भर

देवगावफाटा : शेतकऱ्यांचे पशूधन धोक्यात आणणाऱ्या लम्पी सदृश आजाराची लक्षणे देवगावफाटा भागातील काही गावांतील जनावरांना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने परिसरातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यासह उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पादनाचे साधन पशूधनाकडे पाहिले जाते. या जनावरांचा शेतकरी मुलांप्रमाणे सांभाळ करीत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी स्कीन या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक जनावरांच्या अंगावर गाठी, ताप येणे, डोळ्यातून व नाकातून चिकट द्रव येणे, चारा कमी खाणे, पाणी कमी पिणे, पायावर सूज येऊन लकवा येणे, या सारखी लक्षणे दिसत आहेत.

जर या जनावरांकडे दुर्लक्ष झाले तर ही जनावरे दगावण्याचीही भीती अधिक आहे. त्यामुळे जनावरावर आलेले हे संकट शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटणारे आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. बोरकीनी व चिकलठाणा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येत असलेल्या देवगावफाटा, नांदगाव, बोरकीनी, नरसापूर, नागठाणा, कुंभारी या गावामधील १,२६५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण शिबिराचे उद्‍घाटन बोरी : ग्रामपंचायत व पशुवैद्यकिय दवाखाना (बोरी) यांच्या संयुक्त विद्यमाने लम्पी स्कीन या पशुरोगाचे मोफत लसीकरण शिबिराचे उद्‍घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांचे हस्ते बुधवारी करण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. शाहेद देशमुख यांनी लम्पी स्कीन रोगाची कारणे, प्रसार- लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी पशुपालकांना मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये एकूण २४३ गायवर्गीय पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रदीप चौधरी, शेख रफीक, डॉ. शाहेद देशमुख, सुभाष घोलप, राहुल कनकुटे, सखाराम सोगे, शशिकांत चौधरी, इमरान खान, खिझर कुरेशी, करुण नागरे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मो. एजाज अन्सारी, भगवान कंठाळे, सय्यद हैदर, नईम पटेल, राजेश पंडित, शशिकांत लाखकर, राहुल मानवते यांनी पुढाकार घेतला होता.

पशुसंवर्धन विभाग ‘ॲक्टीव’

बोरकीनी व चिकलठाणा पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येत असलेल्या भागातील बाराशेपेक्षा अधिक पशुधनाचे लसीकरण करून घेण्यात आले आहे. एवढेच नाही तर पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पशुधनाला घ्यावयाच्या खबरदारी विषयीही मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे सध्या पशुसंवर्धन विभाग ‘ॲक्टीव’ झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Lumpy Emphasis On Vaccination 1265 Vaccination Of Livestock Animal Virus Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..