
Lumpy Skin Disease : ‘लंपी’चा फेरा; २८ दिवसांत ५४० जनावरे दगावली
बीड : यंदा जिल्ह्यातील शेतकरी गोगलगाईंचा प्रादुर्भाव, पावसाची उघडीप, अतिवृष्टी, सतत पाऊस आणि आता गोवंशीय जनावरांमध्ये लंपी या त्वचेच्या संसर्गजन्य आजाराची साथ सुरु आहे. या आजाराचा फैलाव जिल्हाभरात असून आतापर्यंत तब्बल ५४० जनावरे लंपी या साथीच्या आजाराने दगावली आहेत. गंभीर बाब म्हणजे केवळ २८ दिवसांत ४६६ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, लंपी आजारात जनावरांचा मृत्यूदर साधारण ४.८३ टक्के आहे. तीन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातून लंपी या जनावरांमधील साथ आजाराची सुरुवात झाली. गोवंशीय (गाय, बैल, वासरू) जनावरांमध्ये हा आजार पसरत गेला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या साथीची लागण झाली आहे.
आतापर्यंत २८२ गावांमध्ये या आजाराचा फैलाव झाला आहे. या संसर्गजन्य त्वचेच्या आजाराची तब्बल ११ हजारा १८० जनावरांना लागण झाल्याचे समोर आले आहे. उपचारानंतर ६०२० जनावरे बरी झाली असून आजही ४६१३ जनावरे या आजाराने बाधीत आहेत. यातील १७७ जनावरे गंभीर आजारी आहेत. प्रशासनाने सुरुवातीपासून या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण, जनावरांचे बाजार बंद, वाहतूक बंद अशा उपाययोजना हाती घेतल्या. जिल्ह्यात सर्व पाच लाख पाच हजार ५०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागासह खासगी पशुवैद्यकांच्या मदतीने लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात या आजाराने ५४० जनावरे दगावली आहेत. ता. पाच नोव्हेंबर रोजी या आजाराने ८४ जनावरांचा मृत्यू झाला होता. शनिवारपर्यंत (ता. तीन) या २८ दिवसांत तब्बल ४६६ जनावरे दगावली आहेत.
७० जनावरांच्या मालकांना १७ लाख ७० हजार
जिल्ह्यात आतापर्यंत ५४० जनावरे (गाई, वासरे, बैल) दगावली आहेत. शासनाने मृत जनावरांच्या मालकांना गाईसाठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५ हजार रुपये तर वासरासाठी १६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. आतापर्यंत ७० जनावरांच्या शेतकरी मालकांना १७ लाख ७० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दिली. आणखी ३१ जनावरांच्या मालकांना सानुग्रह अनुदानाची नऊ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम सोमवार (ता. पाच) पर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग होईल.
७० जनावरांच्या मालकांना सानुग्रह अनुदान वाटप
मृत्यूदर पावणे पाच टक्क्यांहून अधिक
शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी
पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी आजाराची लागण झालेल्या जनावरांसाठी खालील पद्धतीने काळजी घेण्याचे सुचविलेले आहे.
विलगीकरण केलेल्या जनावरांसाठी तात्पुरता निवारा करावा.
दिवसातून तीन वेळा ताज्या पाण्यात गूळ व मीठ मिसळून पाजवावे.
सुजलेल्या भागावर पाण्यात मीठ मिसळून गरम करून शेक द्यावा.
सरकी, पेंड, सुग्रास असे प्रथिनेयुक्त खाद्य जनावरांना चारावे.
सोयाबीनचा भाजलेला भरडा, हुलगे खाऊ घालावेत.
क्षारांचे मिश्रण जनावरांना द्यावे.