जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठीच महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

भोकरदन येथील सभा ही शुभ मानली जाते.  2014 साली मी भोकरदनला संघर्ष यात्रेदरम्यान सभा घेतली. तेव्हा तत्कालीन काँग्रेस-राष्‍ट्रवादी सरकारला खाली खेचण्याचे आवाहन केले होते, त्या नुसार जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले.

भोकरदन : यात्रा काढणे ही भारतीय जनता पक्षाची परंपरा असून आम्ही विरोधी असताना संघर्ष यात्रा काढली आणि सत्तेत असलो तर संवादाची यात्रा काढून जनतेचा आशीर्वाद घेत आहोत, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

भोकरदन येथे बुधवारी (ता.28) भाजपची महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्यासह आदीची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोकरदन हा जरी रावसाहेब पाटलांचा गड असला तरी येथे जनादेश यात्रा घेण्याची दोन कारणे आहेत. भोकरदन येथील सभा ही शुभ मानली जाते.  2014 साली मी भोकरदनला संघर्ष यात्रेदरम्यान सभा घेतली. तेव्हा तत्कालीन काँग्रेस-राष्‍ट्रवादी सरकारला खाली खेचण्याचे आवाहन केले होते, त्या नुसार जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले.

दुसरे कारण म्हणजे, "बाप से बेटा सवाई" असे म्हणत त्यांनी आमदार संतोष दानवे त्यांना तुम्ही विक्रमी मतांनी निवडून देणार हे विचारण्यासाठी मी या जनादेश यात्रेच्या निमित्ताने आलेलो आहे, असे फडणवीस म्हणाले.

यावेळी फडणवीस यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे अभिनंदन करत मराठवाड्यासाठी मंजूर केलेल्या वॉटर ग्रीड योजनेचे देखील कौतुक केले. येणारी मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून धरणातून पाईपलाईनद्वारे मराठवाड्यात पाणी आणले जाईल. तसेच कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी बोगद्यातून गोदावरीच्या पात्रात सोडण्याचे काम हे शासन करणार असून आजच जालना-औरंगाबाद वॉटरग्रीडची चार हजार कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असून 64 हजार किलोमीटरची पाईपलाईन करुन धरणे जोडण्याचे काम केले जाणार आहे. हे प्रत्येक शहराला पाणी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले. 

सुप्रिया सुळे निवडून आल्या, तेथे ईव्हीएम चांगले; अन्‌ इथे रावसाहेब दानवे निवडून आले, तर ईव्हीएममध्ये बिघाड, म्हणून विरोधक ओरड करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र ईव्हीएममध्ये बिघाड नसून विरोधकांच्या डोक्‍यातच बिघाड असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाजनादेश यात्रा ही जनतेच्या दर्शनासाठी आहे. आमच्या महाजनादेश यात्रेला मैदान पुरत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा मंगल कार्यालय भरत नाही, अशी शोकांतिका काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची आहे.

कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी यावेळी आमदार संतोष दानवे यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच रामेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajanadesh Yatra to seek the blessings of the people says CM Fadnavis