तपासणीशिवाय महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी

युवराज धोतरे
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणूंच्या संसर्गजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्नाटक शासन सतर्क झाले आहे. चार दिवसांपासून उदगीर तालुक्यातुन कर्नाटकात जात असलेल्या तीन सीमेवर तपासणीशिवाय महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. त्यांची स्क्रिनिंग तपासणी करून व्यक्तिशः नोंदणी करून सोडण्यात येत आहे.

उदगीर (जि.लातूर) : कोरोना विषाणूंच्या संसर्गजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्नाटक शासन सतर्क झाले आहे. चार दिवसांपासून उदगीर तालुक्यातुन कर्नाटकात जात असलेल्या तीन सीमेवर तपासणीशिवाय महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. त्यांची स्क्रिनिंग तपासणी करून व्यक्तिशः नोंदणी करून सोडण्यात येत आहे. उदगीर तालुक्यातून गुंडोपंत दापका, तादलापुर व तोगरी या तीन ठिकाणाहून कर्नाटकात रस्ते गेलेली आहेत. यातील सीमेवर कर्नाटक शासनाने पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रवाशांना तपासणी बंधनकारक केली आहे. त्यांची स्क्रिनिंग करण्यात येत असून त्यात काही आढळले तर ते लगेच आरोग्य विभागाशी कल्पना देऊन त्यांच्याकडे रेफर करत आहेत.

गुंडोपंत दापका, तादलापुर व तोगरी जवळील सीमा भागातील नाक्यावर आरोग्य कर्मचारी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची नोंदणी करून घेत आहेत. कुठून आलात? कुठे जायचे? कोणाकडे राहणार? किती दिवस राहणार? राहण्याचे कारण? यासंबंधीची माहिती नोंद करून संबंधित त्या त्या गावातील आरोग्य यंत्रणेकडे ही माहिती पाठवून महाराष्ट्रातील नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

वाचा ः Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; रूग्णाची संख्या....

मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोणीही विचारत नसल्याची स्थिती आहे. हैदराबाद येथून उदगीरला येणाऱ्या प्रवाशांची कोणी दखल घेत नसून याच सीमा भागातून हे प्रवासी उदगीर मध्ये दाखल होत आहेत. कोण कोठून येते? कोठे राहते व काय करते? याची माहिती महाराष्ट्र शासनाला होत नसल्याची बाब गंभीर असल्याचे यावरून दिसून येते. महाराष्ट्रात निर्माण झालेली कोरोना संसर्गजन्य परिस्थिती कर्नाटकात येऊ नये यासाठी कर्नाटक शासनाने कडक पावले उचलली असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने पुण्या-मुंबईच्या प्रवाशांचा जास्त भरणा आहे.

तिथे कर्नाटकातून कामासाठी गेलेली मुले जास्त प्रमाणावर परत येत आहेत. पुण्या-मुंबईला राहिलेली कर्नाटकातील मुले त्यांचीही तपासणी होत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांचीही संसर्गजन्य परिस्थितीची पार्श्वभूमी यातून समोर यावी हा कर्नाटक शासनाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तोगरी-कमालनगर दरम्यान कर्नाटक सरकारने उभारलेल्या तपासणी केंद्राला रविवारी (ता.२२) उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, मंडळ अधिकारी शंकर जाधव यांनी भेट देऊन माहिती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Travelers No Entry Without Checking In Karnataka