esakal | औरंगाबाद पश्चिम : संजय शिरसाट विजयी, 40 हजार मताधिक्य | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Shirsat

पोस्टल मतदानामध्येही संजय शिरसाट यांना आघाडी 

औरंगाबाद पश्चिम : संजय शिरसाट विजयी, 40 हजार मताधिक्य | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद  -  औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत आपला विजय संपादन केला. शिरसाट हे  40 हजार 54 मतांनी विजयी झाले. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना अवघ्या 43  हजार मतांवर समाधान मानावे लागले.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ 1990 पासून दोन अपवादात्मक निवडणुका वगळता शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून संजय शिरसाट यांनी आपली आघाडी कायम ठेवली. पहिल्याच फेरीत शिरसाट यांना 1242 मतांची आघाडी मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये ही आघाडी वाढतच गेली. 

भाजपचे बंडखोर नगरसेवक राजू शिंदे हे शेवटपर्यंत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र, दोघांच्या मतांमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत 40 हज़ार पेक्षा अधिक मतांचा फरक पडला. दुसऱ्या फेरीपासून संजय शिरसाठ यांची आघाडी सातत्याने वाढत राहिली.   पोस्टल मतदानामध्येही संजय शिरसाट यांनी आघाडी घेतली. त्यांना 693 पोस्टल मते मिळाली. त्या खालोखाल राजू शिंदे यांना 302 मते मिळाली. तर संदीप शिरसाट यांना 149 पोस्टमध्ये मिळाली. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेना-भाजप महायुतीचा पारंपरिक मतदार महायुतीसोबत असल्याचे दिसून आले. 

मतदारांनी मला भरघोस मतांनी विजयी केले त्यांचा मी मनापासून आभारी आहे. अनेक जणांचा माझ्या विचारांमध्ये वाटा आहे. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकास कामांची जनतेने मला पावती दिली आहे. या विजयामुळे माझी निश्चितच जबाबदारी वाढली आहे.
- संजय शिरसाट

 

अशी आहे औरंगाबाद पश्‍चिम मतदारसंघाची पार्श्‍वभूमी 
2004 मध्ये शहरात दोनच मतदार संघ होते औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्‍चिम. पश्‍चिममध्ये कॉंग्रेस उमेदवाराला 1 लाख 54 हजार 56 मतांनी विजयी झाले होते तर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना 1 लाख 46 हजार 170 मते मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी 10 उमेदवार मैदानात होते त्यात तीन अपक्ष होते.

2009 च्या निवडणुकीत औरंगाबाद शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम मतदार संघात मध्य विधानसभा मतदार संघाची भर पडली आणि 2009 मध्ये पश्‍चिम मतदार संघातुन शिवसेनेचे संजय शिरसाट पहिल्यांदा आमदार झाले होते. 2009 मध्ये एकूण 19 उमेदवार मैदानात होते त्यात पहिल्यांदा संजय शिरसाट विजयी झाले होते त्यांना 58 हजार 8 मते मिळाली होती
तर दुसऱ्या क्रमांकावरचे दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे चंद्रभान पारखे होते त्यांना 43 हजार 797 मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर भारिपचे अमित भुईगळ होते त्यांना 3 हजार 791 मते मिळाली होती. त्यावेळी तब्बल 11 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.  2014 मध्ये या मतदार संघात 18 उमेदवार होते.

काॅंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बसप, मनसे, आरपीआय ( के.) सह अन्य पक्षांचे उमेदवार होते तर 6 अपक्ष मैदानात होते. त्यात शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी 61 हजार 282 मतांनी विजयी झाले होते तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे मधुकर सावंत यांना 54 हजार 355 मते मिळाली होती. वैध मतांची संख्या 1 लाख 84 हजार 679 इतकी होती तर नोटाचे प्रमाण 1 हजार 131 इतके होते. 1995 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 1 लाख 26 हजार 700 मते मिळवून आमदार झाले होते. 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पहिल्यांदा 88 हजार 964 मते घेउन विजयी झाले होते. 1985 मध्ये एस कॉंग्रेसचे अमानुल्ला मोतीवाला होते.