
दुष्काळ, नापिकी आणि कर्जाशी लढतांना शेतकऱ्याला सर्वाधिक त्रास महावितरणच्या भोंगळ कारभाराचा होत असून नादुरुस्त रोहित्र महिनोंमहिने मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चोवीस तासांत रोहित्र चालू करून देण्याची तरतूद असतांना महावितरणकडून मुद्दाम छळले जाते.
औसा (जि.लातूर) : दुष्काळ, नापिकी आणि कर्जाशी लढतांना शेतकऱ्याला सर्वाधिक त्रास महावितरणच्या भोंगळ कारभाराचा होत असून नादुरुस्त रोहित्र महिनोंमहिने मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चोवीस तासांत रोहित्र चालू करून देण्याची तरतूद असतांना महावितरणकडून मुद्दाम छळले जाते. या कारणावरून रोहित्र देण्यात कुचराई केलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी सक्त सूचना उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केल्या. शनिवारी (ता.१२) येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
कोरोनाच्या कचाट्यात ४३ केंद्रांवर नीट, लातूर जिल्ह्यातून १६ हजार ८८४ विद्यार्थी...
या आढावा बैठकीत ३० डिसेंबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मांडण्यात आलेल्या सुचनेवरुन कोणते कामे पूर्ण झाले व कोणती कामे अद्याप झालेली नाहीत याची माहिती घेतली. यावेळी उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांनी त्या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या समस्यांपैकी ६१ कामे पूर्ण केल्याची माहिती या बैठकीत दिली. या बैठकीत शेतकऱ्यांनी वीज जोडणी लवकर मिळत नाही. रोहित्री लवकर दिले जात नाहीत, अशा तक्रारी केल्या.
काय सांगू दादा, कोरोनाने घात केला ! 'म्या' पाच एकर पपईचा बाग मोडला !
यावेळी संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांच्या विभागातील महावितरण अभियंता यांना बैठकीत याबाबत जाब विचारुन शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सुचना करीत संबंधित शेतकऱ्यांना मांडलेली अडचण सांगितलेल्या वेळीत महावितरण कंपनीने नाही सोडविल्यास आपणाकडे याची माहिती द्यावे असे श्री.पवार व श्री.निंबाळकर यांनी सांगितले. संबधित विभागातील रोहित्र जळाल्यानंतर मुदतीत नाही मिळाला तर महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांनी संबधित अभियंत्यांवर कारवाई करावी. महावितरण कंपनीच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे काम करावे.
ज्यांनी करुन शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यास मदत मिळेल महावितरणकडून विविध योजनांबाबत प्रस्ताव द्यावे. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही तो निधी आणण्यासाठी प्रयत्न करु असे यावेळी उभयतांनी या बैठकीच्या माध्यमातून सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, मुख्य अभियंता श्रीकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश शिंदे, संतोषअप्पा मुक्ता, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार, शेखर चव्हाण, कार्यकारी अभियंता विष्णु ढाकणे, कार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे, नगरसेवक गोपाळ धानूरे, समीर डेंग, संजय कुलकर्णी, भाजपचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, धनराज काजळे, गोविंद मुडबे, विकास नरहरे, पप्पूभाई शेख, महावितरण अभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.
तीस किलो चांदीची तस्करी, सापळा लावून चौघा जणांना पोलिसांनी केले अटक
कंत्राटदाराचे लाड पुरवू नका - निंबाळकर
एखाद्या कामाचे कंत्राट कंत्राटदाराला दिल्यावर तो अथवा एजन्सी काम करीत नसेल तर त्याचे लाड पुरवू नका. त्याला तातडीने बदलून नवीन कंत्राटदाराला अथवा एजन्सीला ते काम द्या. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. शेतकऱ्याला त्रास दिला तर तो मला दिल्यासारखा आहे याचे भान ठेवून काम करा, अडचणी असतील तर आम्हाला सांगा अशी सूचनाही खासदार श्री. निंबाळकर यांनी यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना दिली.
संपादन - गणेश पिटेकर