esakal | परभणीत मोठी घटना टळली : जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटला

बोलून बातमी शोधा

परभणी
परभणीत मोठी घटना टळली : जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटला
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटल्याची घटना मंगळवारी (ता. 27) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, तातडीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून रुग्णालयातील ऑक्सीजनवर असणाऱ्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हालविले. रात्री उशिरा हा पाईप दुरुस्त करण्यात आला. अन्यथा नाशिक घटनेची पुनरावृत्ती होती काय अशी शंका निर्माण झाली होती.

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांसह इतर अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सीजन मिळावा यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच एक ऑक्सीजन प्लॅन्ट उभारण्यात आलेला आहे. मंगळवारी (ता. 27) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जोराचे वादळी वारे सुटले होते. या वाऱ्यामुळे ऑक्सीजन प्लॅन्टजवळ असलेले एक मोठे झाड या ऑक्सीजन प्लॅन्टच्या पाईपवर तुटून आदळले. ज्या पाईपवर हे झाड आदळले तोच पाईप रुग्णांना ऑक्सीजन पुरविणारा होता. तो पाईप फुटल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन गळती होत होती. याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सकांसह इतर डॉक्टरांना दिली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख हे देखील त्यावेळी जिल्हा रुग्णालयातच होते. त्यांनी तातडीने ही माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना फोनद्वारे कळविली.

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिक्षक जयंत मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेवून घटनास्थळ गाठले.

जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ऑक्सीजनवर असणाऱ्या रुग्णाना सुरक्षित हलविण्याचे आदेश दिले. जिल्हा रुग्णालयातील 13 रुग्ण ऑक्सीजनवर होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या प्लॅन्टच्या पाईप दुरुस्तीचे काम सुरु होते. तो पर्यत जिल्हाधिकाऱ्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी जिल्हा रुग्णालयात बसून होते. सुदैवाने या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ऑक्सीजन प्लॅन्टच्या फुटलेल्या पाईपचे काम पूर्ण करण्यात आले असून ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे