मक्केत यात्रेकरूंसाठी महाराष्ट्र सदन उभारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 June 2019

'महाराष्ट्रातून हजयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या धर्तीवर मक्का येथेही राज्य सरकारने महाराष्ट्र सदन उभारावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे,'' अशी माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिली.

लातूर - 'महाराष्ट्रातून हजयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या धर्तीवर मक्का येथेही राज्य सरकारने महाराष्ट्र सदन उभारावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे,'' अशी माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिली. यात्रेकरूंच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यासह 20 "हज दोस्त' नेमले जाणार असल्याचे ते म्हणाले.

समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सिद्दीकी प्रथमच बुधवारी लातूरला आले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू हजला जातात. मक्का येथे राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते. यात्रेकरूंना तेथे चांगल्या सुविधा मिळायला हव्यात, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मक्का येथे महाराष्ट्र सदन उभारण्याची मागणी केली आहे.'' केंद्र सरकारने प्रथमच "हज ऑर्गनायझेशन ग्रुप' हे पोर्टल सुरू केले आहे. त्यावरील कंपन्यांच्या यादीची पडताळणी प्रत्येक यात्रेकरूंने करून घ्यावी. त्यामुळे फसवणूक टळण्यास मदत होईल, असेही सिद्दीकी म्हणाले.

राज्यातील हज यात्रेकरू
35,711 अर्ज भरलेले
14,695 निवड झालेले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makka Pilgrim Maharashtra Sadan Demand