
धाराशिव : जिल्ह्यात आतापर्यंत मराठा कुणबी अशा ४५९ नोंदी सापडल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. शुक्रवारी (ता.२७) जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे पुरावे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडे दिले आहेत. यासाठी ४० लाख ४९ हजार कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. त्यामध्ये या नोंदी आढळून आल्या आहेत.
४०७ नोंदी १९४८ च्या पूर्वीच्या आहेत. तर उर्वरीत ५२ नोंदी १९६७ पर्यंतच्या आहेत. दरम्यान, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आली होती. त्या समितीनेही शुक्रवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बैठक घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनीही याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. महसूल, मुद्रांक, पोलिस, भूमी अभिलेख, शिक्षण आदी विभागातही यातील काही नोंदी सापडल्या आहेत.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे : ठाकूर
महाराष्ट्रातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या गरजवंत मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांत टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने तातडीने करून आपल्यावर असलेला मराठा समाजाचा विश्वास सार्थ ठरवला, अशी मागणी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शुक्रवार ( दि. २७ ) मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची मागणी अनेक दशकांपासून आहे. या मागणीकरीता राज्यातील मराठा समाजाने अनेकवेळा राज्यभर आंदोलने केली आहे.
यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊन सदर आरक्षण उच्च न्यायालयात टिकविले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विरोधातील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने व महाविकास आघाडी सरकारचा नतदृष्टेपणा यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गमवावे लागले आहे.
आपल्याला फक्त महायुतीचे सरकारच आरक्षण देऊ शकते, हा विश्वास मराठा समाजात असल्याने या आरक्षणाच्या मागणीचा उठाव महायुती सत्तेत असल्यावर राज्यभर होतो. तरी महाराष्ट्रातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या गरजवंत मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांत टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने तातडीने करून आपल्यावर असलेला मराठा समाजाचा विश्वास सार्थ ठरवावा, असे निवेदन माजी आमदार ठाकूर यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.