
अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील परळी येथे मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरु झाले आणि पाहता पाहता त्याचे लोण राज्यात पसरले होते...
गेवराई (बीड): अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील परळी येथे मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरु झाले आणि पाहता पाहता त्याचे लोण राज्यात पसरले. आता जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण आता गेवराई तालुक्यात पोहचले असून तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे सोमवार (ता. एक) पासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
या आंदोलनास मराठा समाज बांधवांसह इतर समाजाचाही प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी या आंदोलनाला कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार राजेंद्र जगताप, रमेश पोकळे, बीड मराठा क्रांती समन्वय समितीचे समन्वयक भानुदास जाधव, अशोक हिंगे, सचिन मोटे आदींनी भेटी दिल्या.
लातूर जिल्ह्यात विद्यूत खांबावरून पडून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू |
दरम्यान, अडीच वर्षांपूर्वी परळी येथे ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरु झाले. साधारण तीन आठवडे आंदोलन चालले होते. याचे लोण राज्यभर पसरले आणि पाहता पाहता आंदोलनाने उग्र रुपही धारण केले होते. आंदोलनादरम्यान समाजाच्या ४३ युवकांनी राज्यभरात आत्मबलिदान दिले. त्यानंतर आरक्षणाचा निर्णयही झाला. पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून आता त्यावर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत आणि कुटूंबातील एकाला शासकीय नोकरीचे आश्वासन तत्कालिन महायुती आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारने दिले. परंतु, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी साष्टपिंपळगाव येथे मागच्या १२ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची ठिणगी आता गेवराई तालुक्यात पोहचली असून मालेगाव येथे हे आंदोलन सुरू झाले असून गावातील सर्व ग्रामस्थांनी महिला मुलांबाळासह या आंदोलनात ठिय्या मांडला आहे. जो पर्यंत या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे.
लातूर जिल्ह्यात विद्यूत खांबावरून पडून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू |
आंदोलनाचे परिणाम सरकारला भोगावे लागतील - नरेंद्र पाटील
मराठा आरक्षण प्रलंबित निर्णय प्रश्नी जानेवारी पासून जालना जिल्ह्यातील सष्टपिंपळगाव येथुन सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाची ठिणगी राज्यभरात पसरणार असून या आंदोलनाचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा नरेंद्र पाटील यांनी या आंदोलनाला संबोधित करताना केली. साष्टपिंपळगाव आणि मालेगाव खु ग्रामस्थांनी सुरू केलेली ही आंदोलनाची ठिणगी राज्यभरात पोहचणार असून हे आंदोलन पेटण्याच्या आत सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल नसता याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.
निर्णय घेण्यास भाग पाडू- आमदार पवार
तत्कालीन सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी समाजाच्या भावना समजावून घेत या बाबत सभागृहात या विषयी चर्चा करून समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण जाहीर केले होते मात्र हे आरक्षण कोर्टात गेल्यानंतर आताच्या सरकारने उदासीनता दाखवून पाठपुरावा न केल्यामुळे कोर्टात फेटाळले असून आता यासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू असे यावेळी बोलताना आमदार लक्ष्मण पवार सांगितले.
(edited by- pramod sarawale)