वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा

लक्ष्मण वाकडे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

तालुक्यातही विविध ठिकाणी उत्सव
महाशिवरात्री यात्रेनिमित्त शहरातील संत जगमित्र नागा मंदिर, सोपान काका मंदिर, सुर्वेश्वर मंदिर, परिसरातील जिरेवाडी येथील सोमेश्वर, नागापूर येथील श्री नागनाथ, टोकवाडी येथील रत्नेश्वर, तपोवन येथील तपेश्वर, धर्मापूरी येथील मल्लिकार्जून केदारेश्वर, बेलंबा, नाथरा, गाढेपिंपळगाव येथीलही शिवमंदीरांतही यात्रात्सवाची गर्दी आहे. 

परळी वैजनाथ : देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या वार्षिक यात्रा महोत्सवाला मंगळवार (ता.13) पासून सुरवात झाली. दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागल्या. यात्रोत्सवासाठी लाखो भाविक शहरात जमले आहेत. गर्दीने मंदिर परिसर गजबला आहे.

यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसह तीनशेवर पोलिसांचा बंदोबस्त असून मंदिर परिसरात शंभरावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले आहेत. सोमवारी (ता.12) मध्यरात्रीच ‘श्री’ ची महापूजा होवून सर्वसामान्य भाविकांसाठी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनास सुरवात झाली. तेव्हापासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. 

यात्रोत्सवा निमित्ताने रंगरंगोटी, साफसफाई, दर्शन रांगांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून गेले आहे. दर्शन रांगेत उभ्या भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून कापडी मंडप टाकण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली गेली आहे. देवस्थान संस्थेचे सचिव राजेश देशमुख, तहसीलदार शरद झाडके, स्थानिक पोलिस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रोत्सवाच्या तयारीत झाकून दिले आहे. 

तालुक्यातही विविध ठिकाणी उत्सव
महाशिवरात्री यात्रेनिमित्त शहरातील संत जगमित्र नागा मंदिर, सोपान काका मंदिर, सुर्वेश्वर मंदिर, परिसरातील जिरेवाडी येथील सोमेश्वर, नागापूर येथील श्री नागनाथ, टोकवाडी येथील रत्नेश्वर, तपोवन येथील तपेश्वर, धर्मापूरी येथील मल्लिकार्जून केदारेश्वर, बेलंबा, नाथरा, गाढेपिंपळगाव येथीलही शिवमंदीरांतही यात्रात्सवाची गर्दी आहे. 

जिरेवाडी येथील सोमेश्वर या शिवलिंगाच्या पालखीची पारंपारीक मिरवणूक निघणार आहे. संत जगमित्र नागा, संत सोपानकाका यांच्या पालखी, दिंड्यांची मिरवणूकही निघणार आहे. 

दरम्यान, वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या यात्रोत्सवा निमित्त शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या हस्ते शासकीय महापुजा होईल. बुधवारी (ता.14) मंदिरात भजन, प्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. तर गुरूवारी (ता.15) सायंकाळी पारंपारीक पध्दतीने वाजतगाजत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या पालखीची मिरवणूक शहरातून निघणार आहे. ही पालखी देशमुखपार परिसरात आल्यानंतर गायक पंडित आनंद भीमसेन जोशी (पुणे) यांच्या भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता होणार आहे. रात्री नउ वाजता शहरातील अंबेवेस भागातील सरस्वती नदी परिसरात शोभेची दारूही उडवण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील नांदूवेस, गणेशपार, गोपनपाळे गल्ली भागात स्थानिक कलावंतांचा भजन व भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या पालखी मिरवणुकीनंतर शुक्रवारी (ता.16) बिदागी व प्रसाद असे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर तीन दिवस चालणार्‍या या यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.

Web Title: Marathi news Marathwada news vaijanath jyotirling