esakal | Marathwada: "तातडीनं मदत द्या, नाही तर दिवाळीला दिव्यांऐवजी चिता पेटतील"
sakal

बोलून बातमी शोधा

ढगफुटीमुळे शेतीचं मोठं नुकसान

Exclusive: "तातडीनं मदत द्या, अन्यथा दिवाळीला दिव्यांऐवजी चिता पेटतील"

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांत पावसानं चांगलाच जोर धरल्याचं दिसतंय. त्यातच मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा ढगफुटी आणि वादळी पाऊस झाला. नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मरावाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपून काढलंय. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांना या पावसाचा फटका बसला असून, शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत सरासरीच्या १४९ टक्के पाऊस झाला असून, प्रथमच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली या भागात पावसानं शेतकरी पुरता उध्वस्त झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेलं पिक आडवं झालंय. शेतातल्या पिकासोबतच जनावरं सुद्धा पाण्यात वाहून गेल्याच्या घटना बीड, हिंगोली परिसरात घडल्या आहे. कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीसाठी याचना केल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे शेतातील, सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी, टोमॅटो तसंच फळबागांचं नुकसान झालंय. मराठवाड्यातील वेगवेळ्या नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठच्या गावांनाही मोठा फटका बसलाय.

मका पिक पाण्यात

मका पिक पाण्यात

कपाशीच्या शेतात पाणी

कपाशीच्या शेतात पाणी

...तर दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरासमोर चिता जळतील

शेतातील पिकांचं मोठं नुकसान झाल्यानंतर तरुण शेतकरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडतांना दिसता आहेत. यावेळी गंगापूर तालुक्यातील आगाठान गावातील तरुण शेतकरी संदीप औताडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या विदारक परिस्थितीचं वास्तव मांडलं. 'कालच्या पावसानं, अद्रक सोयाबीन मका बाजरी भुईमूग, मूग, तूर, कपाशी, टोमॅटो पिकांचं आतोनात नुकसान झालं. आमच्या शेतात सगळीकडं पाणी तुंबलय, शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभं केलेलं पिक डोळ्यासमोर पाण्यात गेलं, लोकांची शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांना जर लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली नाही तर दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरी दिवा नाही तर चिता पेटलेल्या दिसतील अशा भावना संदीप यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Maharashtra rain Live: महाराष्ट्रात पावसाची कुठे काय परिस्थिती?

बदनापूर तालुक्यातील मका पिक पाण्यात

बदनापूर तालुक्यातील मका पिक पाण्यात

मका, कांदा पाण्यात...

बदनापूर तालुक्यातील शेतकरी अजय शेजूळ यांनी आपल्या गावात पावसानं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं. 'माझ्या शेतात ३ एकर कपाशी, दीड एकर मका आणि कांदे होते. काही दिवसांपुर्वीच कपाशीला कैऱ्या फुटल्या होत्या. पावसामुळं कपाशीच्या कैऱ्या सडल्या, मका आणि कांदे असलेल्या ठिकाणी पाणी तुंबल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं यावर्षी उत्पन्नात मोठी घट होईल असंही ते म्हणाले.

हेही वाचा: मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी धीर सोडू नये - मुख्यमंत्री

लाडसावंगी गावात विहीर ढासळली

लाडसावंगी गावात विहीर ढासळली

ज्या विहीरीच्या पाण्यावर शेती करत होतो ती विहीर ढासळली...

औरंगाबाद तालूक्यातील लाडसावंगी गावातील अशोक किसनराव पडूळ यांची विहीर पावसानं ढासळली. '२७ तारखेपासून जोरदार पाऊस सुरु होता, या पावसामुळं आपल्या शेतातली विहीर ढासळली. याच विहीरीवर सगळी शेती करत होतो, विहीरीत दोन मोटर होत्या, ते सगळं गेलं.' तर शेतकरी रमेश पडूळ यांनी सांगितलं की, '१७ सप्टेंबर २०१५ साली गावात मोठा पुर आला होता, यावर्षी जर आणखी पाऊस झाला तर पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होण्याची भिती असल्याचं त्यांनी सांगितलं. एकूणच या ही सर्व परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा असल्याचं दिसतं आहे. लवकरात लवकर पंचनामे करुन आम्हाला शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी जेणेकरून हा शेतकरी जगेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: लोअर दूधना प्रकल्प धरणाचे चौदा दरवाजे उघडले; पाहा व्हिडिओ

loading image
go to top