मराठवाड्याच्या रेल्वेमार्गावर भंगार इंजिन

अनिल जमधडे
Wednesday, 11 September 2019

 औरंगाबाद रेल्वेस्थानकाने दक्षिण-मध्य रेल्वेच्या टॉप ट्‌वेंटीत आपले स्थान मिळवत, वर्षभरात 73 कोटी, तर गेल्या चार महिन्यांत 25 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. असे असतानाही औरंगाबाद मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्यांना हैदराबाद, विजयवाडा, सिकंदाराबाद, गुंटकल या विभागांतील भंगार झालेल्या इंजिनचा वापर करण्यात येत आहे.

औरंगाबाद, : दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन मराठवाड्यात विशेषत: औरंगाबादच्या बहुतांश रेल्वेगाड्यांना भंगार इंजिन वापरत आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास दोनशे वेळा इंजिन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सातत्याने इंजिन बंद पडण्याच्या घटनांनी प्रवाशांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. 

भंगार इंजिन वारंवर बंद पडत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नकारात्मक भूमिकेने औरंगाबादच्या प्रवाशांवर सातत्याने अन्याय सुरू आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकाने दक्षिण-मध्य रेल्वेच्या टॉप ट्‌वेंटीत आपले स्थान मिळवत, वर्षभरात 73 कोटी, तर गेल्या चार महिन्यांत 25 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. असे असतानाही औरंगाबाद मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्यांना हैदराबाद, विजयवाडा, सिकंदाराबाद, गुंटकल या विभागांतील भंगार झालेल्या इंजिनचा वापर करण्यात येत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या किरकोळ महसूल देणाऱ्या रेल्वेस्थानाच्या रेल्वेगाड्यांना नवीन इंजिन वापरण्यात येत असून, सर्वाधिक महसूल देणाऱ्या औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या रेल्वेला भंगार इंजिन वापरण्यात येत आहे. दाक्षिणात्य अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराने या भागातील प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ता. चार सप्टेंबरला धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्‍स्प्रेसचे इंजिन करमाडजवळ बंद पडले. त्यामुळे मनमाड-काचिगुडा पॅसेंजर रेल्वेचे इंजिन हायकोर्टला जोडण्यात आले. परिणामी, पॅसेंजरच्या प्रवशांना चार तास ताटकाळावे लागल्याने संतप्त प्रवाशांनी सुपरफास्ट अमृतसर-नांदेड सचखंड एक्‍स्प्रेस रोखून ताबा मिळविला होता. ही घटना रेल्वे प्रवाशांच्या संतापाचे प्रतीक आहे. भविष्यात रेल्वे इंजिन बंद पडल्याची घटना घडली तर प्रक्षोभ होण्यास वेळ लागणार नाही. याची दखल दक्षिण मध्य रेल्वेने घेणे आवश्‍यक आहे. 

असे आहेत भंगार इंजिन  
पॅसेंजर नांदेड-औरंगाबाद (क्र. 17064), औरंगाबाद-नांदेड (क्र. 17063), तपोवन-नांदेड-मुंबई (क्र. 17618), मुंबई-नांदेड (क्र. 17617), पॅसेंजर निजामाबाद-पुणे (क्र. 51422), पुणे-निजामाबाद (क्र. 51421), पॅसेंजर दौंड-नांदेड (क्र. 57515), नांदेड-दौंड (57516), काचिगुडा-मनमाड (57561), मनमाड-काचिगुडा (57562), नांदेड-मनमाड (51542), नगरसोल-नांदेड (51541), नंदीग्राम-नागपूर-मुंबई (क्र. 11402), मुंबई-नागपूर (11401) या सर्व रेल्वेगांड्यांना रंगरंगोटी केलेले भंगार इंजिन वापरले जात असल्याची माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी दिली. 

इंजिन मॅनेजमेंटची कसरत 
एक्‍स्प्रेसचे रेल्वे इंजिन बंद पडल्यानंतर सर्वांत अगोदर लाइनवरील पॅसेंजर रेल्वेचा शोध घेतला जातो. लाइनवर जवळपास असलेल्या पॅसेंजर गाडीला थांबवून एक्‍स्प्रेसला इंजिन जाडले जाते. याशिवाय जवळपासच्या रेल्वेस्थानकावरील मालगाडीच्या इंजिनचाही वापर बंद पडलेल्या गाडीसाठी केला जातो. 

मराठवाड्याच्या औरंगाबाद मार्गावर सर्रास भंगार इंजिन वापरले जात आहेत. रेल्वे सेनेने तत्कालीन विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांच्या माध्यमाने रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केल्याने सात इंजिन मिळाले होते. त्यानंतर पुन्हा नवीन इंजिन मिळालेले नाहीत. इंजिन बंद पडण्याच्या घटना वाढत असल्याने प्रवाशांचा रोष वाढत आहे, याची दखल रेल्वेने घेतली पाहिजे. 
- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada get scrapped Railway Engine