Marathwada Muktisangram 2023 : वेध उद्योगक्षेत्राच्या भविष्याचा

सुरवातीच्या काळात राज्यातील समतोल औद्योगिकीकरणासाठी विशेष प्रयत्न केले गेले.
 औद्योगिकीकरणासाठी विशेष प्रयत्न
औद्योगिकीकरणासाठी विशेष प्रयत्नsakal

स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाडा महाराष्ट्र राज्यात विलीन झाला, त्या घटनेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. सुरवातीच्या काळात राज्यातील समतोल औद्योगिकीकरणासाठी विशेष प्रयत्न केले गेले. १९६० दशकानंतर खऱ्या अर्थाने औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यास सुरवात झाली. उमा सन्स - निर्लेप, एपीआय- रेमोना, बजाज, व्हिडिओकॉन, गरवारे यांसारख्या कंपन्यांनी या प्रदेशात उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. मागील ७ दशकांत छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर येथे एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहती विकसित केल्या गेल्या. ज्याद्वारे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत आणि प्रदेशाचा एकूण आर्थिक स्तर उंचवण्यास मदत झाली आहे.

आशिष गर्दे

मागील काही काळापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) वाहन क्षेत्र, कृषी, बियाणे, औषध, शीतपेये आणि मद्यनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील नामांकित कंपन्या येथे कार्यान्वित आहेत. जालना देशाची स्टील आणि सीड राजधानी आहे.

मराठवाडा कृषिप्रधान क्षेत्र असून, रेशीम आणि कापूस कापड उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. हिमरू कापड म्हणून स्थानिक पातळीवर पिकवलेल्या कापसासह रेशमाचे सुरेख मिश्रण विकसित केले गेले. देशाच्या एकूण कापूस निर्यातीपैकी २५ टक्के हिस्सा मराठवाड्यातून जातो. नांदेड विभागात वस्रोद्योग, यंत्रमाग उद्योग नावारूपास आले आहे.

लातूरमध्ये अनेक तेल आणि साखर कारखाने आहेत. लातूर येथे ऑइल मिल्स, लातूर येथेच रेल्वे कारखान्याच्या माध्यमातून आगामी काळात वंदे भारत या देशातील सर्वांत प्रगत रेल्वेच्या कोचची निर्मिती होणार आहे. ५०,००० पेक्षा अधिक लोकांना थेट रोजगार देणारा हा प्रकल्प औद्योगिक विकासाला औरंगाबाद आणि जालन्याच्या पुढे नेत मराठवाड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत नेईल.

ऑरिक ठरणार दिशादर्शक

शेंद्रा-बिडकीन येथे ऑरिक, हे दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा एक नोड आणि राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरचा भाग असा महत्त्वाकांशी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाचा उद्देश मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तसेच निर्यातीचे प्रमाण वाढवणे आहे. १०००० एकर जागेवर उभे राहणारे हे शहर देशातील पहिली स्मार्ट औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपास येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे औरंगाबाद, जालन्यासह मराठवाड्यातील उद्योग व व्यवसायाची निर्यातक्षमता अधिक बळकट होणार आहे. सद्यःस्थितीत २५ हजार कोटींहून अधिक निर्यात करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास निर्यात अधिक मोठ्या प्रमाणात वाढू शकेल.

कुशल मनुष्यबळासाठी...

मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ उपब्ध करून देण्यामध्ये इंडो-जर्मन टूल रूम, सिपेट, निलेट, तांत्रिक शिक्षण देणारे महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

आज घडीला सुमारे ३०,००० विद्यार्थी दरवर्षी आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बीवायएसटी) आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील उद्योग संघटना उद्योग इकोसिस्टम पोषक करण्यासाठी काम करीत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (जनभागीदारी ) मधून निर्माण झालेले मराठवाडा ऑटो क्लस्टर, देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर यासारखे प्रकल्प भविष्यात इतरही उद्योग क्षेत्रात निर्माण होण्याची गरज आहे.

आगामी काळात होऊ घातलेले प्रकल्प

कोणत्याही राज्याची समृद्धी ही शहरीकरणावर अवलंबून असते, राज्यात शहरीकरणाचे प्रमाण ४५ टक्के असताना मराठवाड्यात हे प्रमाण २७ टक्के आहे, त्यामुळे या विभागात सुधारणांना मोठा वाव आहे. राज्याच्या समतोल विकासासाठी अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. राज्याची राजधानी आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा समृद्धी द्रुतगती महामार्ग सुमारे २०० किमी अंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतून जात आहे.

या महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगरमधून मुंबईला जाण्यासाठीचा वेळ ४ तासांवर येणार आहे. उद्योग आणि कृषी क्षेत्राला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या महार्गाला जालना येथून नांदेडसाठी आणि छत्रपती संभाजीनगर येथून पुण्यासाठी स्वत्रंत्र द्रुतगती महामार्ग तयार करणार आहे.

जालना, नांदेड महामार्गामुळे मराठवाड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत समृद्धी महामार्गाचा लाभ पोचणार आहे. छत्रपती संभाजीनगर- पुणे हा राज्यातील प्रमुख औद्योगिक, शैक्षणिक आणि विभागीय राजधान्यांना जोडणाऱ्या महामार्गाची मागणी गेल्या अनेक दशकांपासून केली जात होती.

भारतमाला प्रकल्पातून होणाऱ्या या प्रकल्पालगत रेल्वेलाइन उभारल्यास त्याचा दुहेरी फायदा होऊ शकतो. मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गालगत हायस्पीड रेल्वे प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी विकसित करण्यासाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. या प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळणार असून, याच्या केंद्रस्थानी छत्रपती संभाजीनगर असल्याने सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार आहे.

जालना येथे होऊ घातलेले ड्रायपोर्ट मराठवाड्याला हे सागरी मार्ग, रेल्वेमार्ग आणि रस्ते यांना जोडण्याचे काम करते. इतर देशांतून सागरी मार्गाने येणारा माल किंवा उत्पादने बंदरावर उतरवले जातात. भविष्यात हे ड्रायपोर्ट स्टील आणि कृषिमालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरेल. सद्यःस्थितीत राज्यातील एकूण औद्योगिक गुंतवणुकीमध्येही विभागाचा हिस्सा ६ टक्के, तर रोजगारामध्ये ५.६ टक्के इतका आहे आणि भविष्यात यात सुधारणा होण्यासाठी मोठा वाव आहे. गरज आहे ती विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या नेतृत्वाची.

आगामी काळात छत्रपती संभाजीनगर येथे उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसोबतच सेवा आधारित क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, इनोव्हेशन, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, डिफेन्स हब आणि ऑरिक औद्योगिक वसाहतीचा सर्वांगीण विकास म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना पुढील २५ वर्षांत मराठवाडा देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, यामध्ये शंका नाही.

स्टार्टअपला पुश

मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत या उपक्रमांतर्गत शेकडो नवीन उद्योग यशस्वीपणे उभे राहिले. मराठवाड्यातील स्टार्टअपना चालना देण्यासाठी ‘मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल'' (मॅजिक) संस्थेचा मोलाचा वाटा आहे. ग्रासरूट इनोव्हेशन करणारे आणि ग्रामीण भागातून पुढे येऊन एखाद्या न सुरू करू शकणाऱ्या समस्येचे नावीन्यपूर्ण उपाय देणारे स्टार्टअप्स पुढे येत आहे.

असे नवउद्योजक राष्टीय पातळीवर पुरस्कार प्राप्त करत आहे. सकाळ समूहाने अशा स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहे.

(लेखक हे मॅजिकचे संचालक आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे विभागीय संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com