esakal | Marathwada : पायी दर्शनाला येणाऱ्यांची संख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

tuljapur

Marathwada : पायी दर्शनाला येणाऱ्यांची संख्या घटली

sakal_logo
By
अविनाश काळे,

उमरगा : नवरात्र महोत्सवाला गुरुवारपासून (ता.सात) प्रारंभ झाला. या काळात तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील हजारो भाविक रोज उमरगामार्गे पायी दर्शनासाठी जातात. पण, यंदा दर्शनपासचे बंधन असल्याने पायी वारी करणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे. शिवाय राज्याच्या सीमेवर महाराष्ट्र पोलिस खासगी वाहनांची चौकशी करीत ऑनलाइन पास काढण्याच्या सूचना देत आहेत. त्याचाही परिणाम भाविकांवर झाला आहे.

तुळजाभवानीमातेवर श्रद्धा असलेल्या भाविकांची संख्या आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मोठी आहे. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी वाहनांतून प्रवास करणाऱ्या भाविकांसह, पायी जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. महामार्गावरील धार्मिक स्थळ, सभागृहात व सुरक्षित आडोशाला भाविक रात्री मुक्काम करतात.

लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक पायी प्रवासात सहभागी झाल्याचे चित्र दरवर्षी असते. गतवर्षी कडक लॉकडाउनमुळे मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने परराज्यातील भाविक आले नाहीत. यंदा मंदिर खुले झाले. पण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश नाही. शिवाय इतर भाविकांना दर्शनपास घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे हातात परडी घेऊन ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करीत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांची संख्या कमी दिसते आहे. भाविकांचा दर्शनासाठी जाण्याचा उत्साह दिसत आहे. मात्र, मर्यादित संख्येचे बंधन आणि पुन्हा गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी दिसत आहे. बहुतांश भाविक खासगी वाहनांनी जात आहेत.

२५ वाहनांना थांबवले

परराज्यातील वाहनांची तपासणी करण्यासाठी उमरग्याची पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. शिवाय ठीक ठिकाणी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणाही आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. आठ) कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातून आलेल्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केली असता दर्शनपास नसल्याचे दिसून आले. त्यामुळे २५ वाहने थांबवावी लागली. भाविकांनी ऑनलाइन पास काढल्यानंतर वाहनांना सोडून देण्यात आली.

loading image
go to top