लिंग बदलून पुरुष बनला ललित, औरंगाबादेत केला सीमाशी विवाह

कमलेश जाब्रस
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

बीड जिल्ह्यातील पोलिस नाईक ललित साळवे हे लहानपणापासून मुलगी म्हणूनच समाजात वावरले. नंतर नोकरीही लागली. मात्र, त्यांना पुरुष असल्याची जाणीव झाली. नंतर त्यांनी लिंग बदलाची शस्त्रक्रियाही करून घेतले. अखेर ललित साळवे यांचा विवाहसुद्धा औरंगाबादेत पार पडला आहे.

माजलगाव (जि. बीड) : येथील शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून सेवेत कार्यरत असलेले ललित साळवे हे लिंगबदलाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर औरंगाबाद येथे मुलगी पाहायला गेले अन्‌ सीमासोबत रविवारी (ता. 16) लग्न लावूनच परतले.

लिंग बदलाच्या प्रकरणात राज्यभरात लक्ष वेधून घेतलेल्या ललित साळवे यांच्या नवीन आयुष्याची वाटचाल सुरू झाली आहे. ललिता साळवे हे मूळ माजलगाव तालुक्‍यातील राजेगाव येथील असून बीड पोलिस दलात कार्यरत आहेत. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे ललिताला पुरुषत्वाची जाणीव होऊ लागली. वैद्यकीय मार्ग अवलंबत मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासण्या करून घेतल्या.

हेही वाचा : इंदुरीकर महाराजांवर शासन गुन्हा दाखल करणार नाही

विविध अडचणींवर मात करत प्रशासकीय व न्यायालयीन संघर्ष केला. शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला. मुंबई येथील खासगी रुग्णालयात वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यानंतर ललिताचा ललितकुमार झाला. माजलगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून ललितकुमार साळवे कर्तव्य बजावत आहेत.

क्लिक करा : "महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा' उभारू, अमित देशमुख यांची घोषणा

रविवारी औरंगाबाद येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता. सीमा बीए तृतीय वर्षात शिक्षण घेत असून ललितकुमार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची त्यांनाही पूर्वकल्पना देण्यात आली. यानंतरच हे दोघेही औरंगाबाद येथे रविवारी विवाहबद्ध झाले आहेत. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतर माझा पुनर्जन्म झाला. आता सीमासोबत विवाहबद्ध झालो असून आयुष्याची नवीन वाटचाल सुरू केली आहे.

हेही वाचा : परीक्षा केंद्रांवर राहणार करडी नजर, मंगळवारपासून बारावीची परीक्षा

पुरुष म्हणून पत्नीला सांभाळण्याची नवीन जबाबदारी आली आहे. आजपर्यंतच्या प्रवासात डॉक्‍टर, पोलिस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबासह सर्वांनीच केलेल्या सहकार्यामुळे हा आनंदी क्षण पाहावयास मिळाला. -ललितकुमार साळवे, पोलिस नाईक, माजलगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage of Lalit Salve who undergoes gender change surgery