esakal | मास्कचे दर दहापटीने घसरले, दोनशेचा मास्क आता साडेसोळा रुपयांना
sakal

बोलून बातमी शोधा

3Mask_7

कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, थर्मलगन, ऑक्सिपल्समीटर अशा वस्तूंना भलताच भाव आला.

मास्कचे दर दहापटीने घसरले, दोनशेचा मास्क आता साडेसोळा रुपयांना

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, थर्मलगन, ऑक्सिपल्समीटर अशा वस्तूंना भलताच भाव आला. शासकीय यंत्रणेला गरज असल्याने त्याची खरेदीही करावी लागली. मात्र, ज्या दराने सुरवातीला खरेदी झाली आता त्याच्या तब्बल दहापट दर कमी झाले आहे. त्यावेळी दोनशे रुपयांचा एन-९५ मास्कचा दर आता चक्क १६ रुपये ६७ पैसे आणि १८ रुपये ६७ पैसे एवढा खाली आला आहे.


त्यावेळी ९५ पैसे दर असलेला सर्जिकल मास्क चक्क १२ रुपयांना खरेदी करावा लागला. आता त्याचा दर केवळ एक रुपया २० पैसे झाला आहे. सुरवातीला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जेवढी या वस्तूंची गरज होती. तेवढीच सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या पुरवठादारांकडून खरेदीचीही होतीच. त्यासाठीच ही मंडळी सुरवातीला लॉकडाउन असले तरी शासकीय कार्यालयांत आणि नियोजन विभागातच तळ ठोकून होती; मात्र खरेदी करणे यंत्रणेला गरजेचे होते आणि बाजारात त्याची उपलब्धताही कमीच होती.

तोंडाला मास्क न लावल्यास आता एक हजार रुपयांचा दंड, उस्मानाबादच्या...

त्यावेळी शरीरातील तापमान मोजण्यासाठी गरजेचे थर्मलगन तब्बल ६४९० रुपयांना खरेदी केले गेले. आता त्याचा दर एक हजार रुपयांच्याही कमी झाला आहे. तर, १५३० रुपयांचे ऑक्सिपल्समीटर चारशे ते पाचशे रुपयांना मिळत आहे. पीपीई किटची खरेदीही बाराशे रुपयांच्या घरात झाली. आता पीपीई किटदेखील फक्त २३८ रुपयांवर खाली आले आहे. त्यावेळी मागणी अधिक आणि उपलब्धता कमी होती; पण त्यात काहींनी संधी साधल्याचेही नाकारता येणार नाही. दरम्यान, ४२ रुपयांना १०० मिलि असणारे सॅनिटायझर आता याच किमतीत दुप्पट मिळत आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर