केज - सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला अष्ठ्याहत्तर दिवस झाले तरी फरार कृष्णा आंधळे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी शासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही.
त्यामुळे अखेर ठरल्याप्रमाणे देशमुख कुटुंबीय व ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २५) अन्नत्याग आंदोलन मस्साजोग येथील महादेव मंदिर परिसरात सुरू केले आहे. वडीलांना न्याय मिळवून देण्यासाठी बारावीची परीक्षा सुरू असताना संतोष देशमुख यांच्या वैभवी या लेकीचा कुटुंब व ग्रामस्थांसह अन्नत्याग आंदोलनात सहभाग आहे.
तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्येच्या घटनेला अष्ठ्याहत्तर दिवस उलटून गेले आहेत. रास्तारोको, जलसमाधी, पाण्याचा टाकीवर चढून आंदोलन करूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे संतप्त मस्साजोग ग्रामस्थांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना मदत करणाऱ्यांचे पुरावे उपलब्ध होऊनही अद्याप सहआरोपी करण्यात आले नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबीय व मस्साजोग ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी महादेव मंदिर परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे, आमदार संदीप क्षीरसागर, रमेशराव आडसकर व भागचंद महाराज झांजे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, या दुर्दैवी हत्या प्रकरणी जिल्ह्यातील विरोधी व सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत आवाज उठविला. मात्र या गुन्ह्याचा निःपक्षपाती तपास होण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याचा पुनरूच्चार केला.
पुरावे मिळूनही आरोपींना मदत करणारांना सहआरोपी का केले जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला. तर यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात काय प्रगती झाली आहे, हा चिंतनाचा विषय झाला आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचा विषय हा साधा असूनही तो शासनाला सोडविता आला नाही.
फुले- शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. राज्य शासन देशमुख कुटुंबाच्या सोबत असताना न्याय मिळत नाही. ऐवढंच काय विरोधी व सत्ताधारी पक्षाचे आमदार या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असून काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असायला हवे होते.
कारण सध्याचे सरकार केवळ आश्वासन देऊन मस्साजोग ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. घटनेला तीन महिन्यांचा काळ होत असूनही सरकार सोबत असताना आरोपींना मदत करणाऱ्या एकालाही सह आरोपी केले नाही. संवेदनशील विषयावर राजकारण करणे हे शासनाला शोभत नाही. विरोधी पक्ष यात राजकारण करतात म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी तरी न्याय दिला का? असा प्रश्न राज्य शासनाला विचारला.
या उपोषणादरम्यान जर आंदोलकांच्या जिवितास धोका झाला तर मात्र राज्यातील मराठ्यांशी गाठ असल्याचा इशारा दिला. तसेच या काळात ग्रामस्थांवर विनाकारण गुन्हे दाखल करणे सरकारला परवडणारे नाही. हे अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय हा सर्वस्वी मस्साजोग ग्रामस्थांचा असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया -
"स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास सीआयडीकडे जाण्याच्या पूर्वीची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांना दिलेली नसल्याचे त्यांची सोमवारी घेतलेल्या भेटीदरम्यानच्या चर्चेतून दिसून आले.
- धनंजय देशमुख, (सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू)
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी आमचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे कौटुंबिक नाते आहे. त्यामुळे मी याकडे राजकारणी म्हणून पहात नसून त्यांना आधार देणे माझे कर्तव्य आहे.
- रमेशराव आडसकर
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या -
१) केजचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे.
२) फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून कठोर शिक्षा करावी.
३) या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी.
४) संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे,
५) वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, पो.कॉ. दिलीप गित्ते, गोरख फड व पोलीस जमादार दत्ता बिक्कड यांचे सीडीआर तपासून यांना सहआरोपी करण्यात यावे.
६) आरोपींना फरार होण्यास मदत करणारे बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे व संभाजी वायबसे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करावे.
७) घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, याची चौकशी करण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.