‘मयुरी’ची किंमत तब्बल अर्धा कोटी

नवनाथ येवले
बुधवार, 25 डिसेंबर 2019

नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत दाखल
पशु प्रदर्शन पाहण्यासाठी अनेकांची गर्दी

नांदेड ः हौसेला किंवा एखाद्या छंदाला मोल नसते, हेच खरे. जगात अशी अनेक माणसे आहेत, ती छंद जपण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करतात. असाच एक छंद म्हणजे अश्‍वपालन किंवा घोड्यांचा. कारण घोडे सांभाळणे ही सोपी बाब नाही. यासाठी आवड असावीच लागते. माळेगावच्या यात्रेत देशभरातून विविध प्रजातीचे घोडे दाखल झाले असून त्यांच्या लाखोंच्या घरात असलेल्या किंमती एकुण नवल वाटायला नको. अशीच एक ‘मयुरी’ नावाची घोडी यात्रेत दाखल झाली असून तिची किंमत चक्क पन्नास लाख म्हणजेच अर्ध्या कोटीच्या घरात आहे.

माळेगावच्या खंडोबा यात्रेस मंगळवारी (ता.२४) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून ही यात्रा पशु प्रदर्शन, घोडे, गाढव, उंट, कुत्रे, गाय, बैल बाजारासाठी दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. यंदाही चक्क अर्ध्या कोटी रुपयांची घोडी यात्रेत दाखल झाली असून या मयुरीला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 

खरेदी - विक्रीतून कोट्यावधींची उलाढाल
माळेगावच्या यात्रेत परंपरेनुसार सारंगखेडा (जि. नंदुरबार) येथील यात्रेनंतर विविध प्रजातीचे देखणे घोडे रवाना होतात. या घोड्यांच्या खरेदी - विक्रीतून कोट्यावधींची उलाढाल होते. त्याचप्रमाणे येथील सिंध, काटेवाड, मारवाड, पंजाब, लुकरा प्रजातींचे अश्वप्रदर्शनही डोळ्याचे पारणे फेडणारे असते. हौशी पालक आपल्या देखण्या घोड्याला प्रदर्शनासाठी मंडप थाटून असतात. आणि ते बघण्यासाठी यात्रेकरुंचीही मोठी गर्दी असते.

हेही वाचा...येथे होते घोड्याबरोबर उंट, गाढव, वळू, कुत्र्यांचीही खरेदीविक्री

शुभ्र पांढऱ्या रंगाची सिंधी प्रजातीची मयुरी घोडी
माळेगाव यात्रेच्या घोडे बाजारात मंगळवारी (ता.२४) आकर्षण ठरली वाशीम येथील गोपाळ रंगभाळ यांची अकरा महिन्याची घोडी. केवळ प्रदर्शनासाठी आणलेल्या या घोडीची किंमत त्यांनी चक्क ४८ लाख रुपये सांगितली. शुभ्र पांढऱ्या रंगाची सिंधी प्रजातीची मयुरी घोडी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली. गोपाळ रंगभाळ यांनी मयुरीवर नजर फिरवणाऱ्या अश्व प्रेमींना संदेश देणाऱ्या होर्डिंगवर ‘पैसा गेला पण, नादच केला परंतु वाया नाही गेला’ असा हौशी संदेश दिला आहे. मयुरी केवळ अश्वप्रदर्शनासाठी आणली असून कोणी इच्छुक असेल तर पन्नास लाख रुपये किंमत ठरवल्याचे सहज आणि हौसेने ते सांगतात.

हेही वाचा...घरी तयार केला ‘प्रभु येशु ख्रिस्त’ जन्माचा देखावा

आकर्षक घोडे हा माझा छंद
माळेगाव यात्रेतील प्रदर्शनासाठी दरवर्षी मी येतो. देखणे, आकर्षक घोडे हा माझा छंद आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून येथील अश्‍व प्रदर्शनामध्ये मी येत असून घोड्यांची विक्री होतेच असे नाही. एखादे हौशी गिऱ्हाईक मिळालेच तर होतो सौदा. मयुरीला केवळ प्रदर्शनासाठी आणले असून विक्रीसाठी आणले नाही. तरी पण एखादा तयार झाला तर त्याची पन्नास लाखापर्यंत विक्री करणार आहे. - गोपाळ रंगभाळ, मयुरी घोडीचे मालक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Mayuri' is worth half a crore