Video : भुकेल्यांना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा आधार

धनंजय देशपांडे
Thursday, 14 May 2020

पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेले लाखों कामगार लॉकडाउनमुळे अडकून पडले. त्यातच कामही बंद पडले आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न निर्माण झाला. स्वतःच्या गावाची ओढ लागल्याने कोणी पायी, तर कोणी मिळेल त्या वाहनाने घराचा रस्ता धरत आहेत. रस्त्यात हॉटेल, ढाबे, खाणावळी बंद असल्याने एका वेळच जेवण करून भागवत आहेत. तर काही रिकाम्या पोटी चालत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पोळी भाजी व खिचडीचे वाटप करण्यात येत आहे.
 

पाथरी (जि.परभणी) : लॉकडाउनमुळे अनेक कामगार घरी जाण्यासाठी पायपीट करत आहेत. तर कोणी वाहनाचा आधार घेत प्रवास करत आहेत. आशांसाठी पाथरी- ढालेगाव महामार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. दररोज शेकडो रिकाम्या पोटांना आधार मिळत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेले लाखों कामगार लॉकडाउनमुळे अडकून पडले. त्यातच कामही बंद पडले आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न निर्माण झाला. स्वतःच्या गावाची ओढ लागल्याने कोणी पायी, तर कोणी मिळेल त्या वाहनाने घराचा रस्ता धरत आहेत. रस्त्यात हॉटेल, ढाबे, खाणावळी बंद असल्याने एका वेळच जेवण करून भागवत आहेत. तर काही रिकाम्या पोटी चालत आहेत. अन्नपाण्यावाचून मजुरांची होणारी आबाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निदर्शनास आली. त्यांनी या पायी व इतर वाहनांतून जाणाऱ्यांना जेवणरूपी मदत करण्याचा निश्चय केला. त्यांनी ही बाब चौधरी गल्ली भागातील सर्व मित्रमंडळी आणि गल्लीतील नागरिकांच्या समोर मांडली. त्यांनी याला प्रतिसाद दिला.

हेही वाचा व पहा : Video : फळबागेचे पाणी तोडून भागविली गावाची तहान

वाटसरूच्या चेहऱ्यावर आनंद
पहिल्या टप्प्यात वैशनव गल्ली, चौधरी गल्लीतील २५ घरांतून दहा ते १५ पोळ्या व त्यासोबत भाजी बनवून देण्याचे ठरले. मागील चार दिवसांपासून सर्वांच्या सहकार्याने दररोज जमा होणाऱ्या पोळी -भाजीच्या घरगुती जेवणाने पाथरी- माजलगाव महामार्गावरून पायी येणाऱ्या कधी पन्नास, कधी शंभर, तर कधी दोनशे जणांच्या रिकाम्या पोटाला अन्नाच्या घासाचा आधार मिळत आहे. तसेच लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल झाल्याने आजपासून जागेवरच पोळी-भाजी व खिचडी बनविण्यास सुरवात केली आहे. भर उन्हात मिळालेल्या या जेवणाने प्रत्येक वाटसरूच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meal arrangements on the highway for the hungry Parbhani News