ज्वारीसह मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

एकात्मीक व्यवस्थापन करण्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे आवाहन

परभणी : सध्या रब्बी हंगामातील ज्वारी व मका पिकाची पेरणी झाली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी रब्बी ज्वारीवर मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसुन येत असून त्यासाठी पुढील प्रमाणे एकात्मीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

लष्करी अळीचे व्यवस्थापन
मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण करावे. सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी एकरी १५ कामगंध सापळे लावावेत तसेच प्रकाश सापळे लावावेत. किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण आदीं) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस आदीं) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी. तसेच खालीलप्रमाणे किटकनाशकांची फवारणी करावी.

जैविक कीटकनाशक
 मेटा–हायजियम अॅनिसोप्ली (१x१०८सीएफयु/ग्रॅम) ५० ग्रॅम, नोमुरिया रिलाई (१ x १०८ सीएफयु/ग्रॅम) ५० ग्रॅम, बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती २० ग्रॅम  वरील जैविक कीटकनाशके पीक १५ ते २५ दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फवारणी करावी.

फवारणीसाठी कीटकनाशके 
 पोंग्याची अवस्थेत (अंडी अवस्था) ५ टक्के  प्रादुर्भाव असल्यास निंबोळी अर्क किंवा ५ टक्के अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली, १०-२० टक्के  प्रादुर्भावग्रस्त असल्यास इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के डब्ल्युअजी किंवा ४ ग्रॅम स्पिनोसॅड ४५ टक्के एससी किंवा ३ मिलीथायामिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ टक्के झेडसी किंवा ५ मिली क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली शेवटच्या अवस्थेतील अळ्या विषारी आमिषाचा वापर करावा. यासाठी १० किलो साळीचा भुसा व २ किलो गुळ २-३ लिटर पाण्यात मिसळून २४ तास सडण्यासाठी ठेवावे. वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये १०० ग्रॅम थायोडीकार्ब ७५ डब्ल्युजी मिसळावे. हे विषारी आमिष पोंग्यामध्ये टाकावे. लष्करी अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहान किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजिव बंटेवाड, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Military aloe attack on maize crop with sorghum ...