दूध संकलन केंद्रांवर छापे, आष्टीत भेसळयुक्त दूधाचा गोरखधंदा 

अनिरुद्ध धर्माधिकारी
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक दूध संकलन केंद्रांवर धाडी 

आष्टी (जि. बीड) : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार (ता. २५) तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रांवर सकाळी छापे टाकत दुधाचे नमुने तपासणीसाठी हस्तगत केले आहेत. राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २५ ते ३० अधिकाऱ्यांच्या पथकाकडून एकाच वेळी तालुक्यात ही कारवाई सुरू असल्याची माहिती हाती येत आहे.

हेही वाचा - धनंजय मुंडेंची 'बाप' कामगिरी; रुळावर सापडलेल्या मुलीचे स्वीकारले...

तालुक्यात कृत्रिम दुधाच्या गोरखधंद्याने पुन्हा डोके वर काढले असून आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये रासायनिक पदार्थ मिश्रित करून हे दूध बनविले जात आहे. याबाबतच्या तक्रारी अऩ्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाल्याने तालुक्यात एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते.

हेही वाचा -  मराठ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही

तालुक्यातील वाघळूज, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, टाकळी आमिया आदी गावांमधील दूध संकलन व शीतकरण केंद्रांवर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून दुधाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतले आहेत. दूध संकलन केंद्रावरील काही जणांनाही या विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती हाती येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk Dairy Raid Ashti Beed