बचतगटातून लाखोंची फसवणूक, निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा, महिला अटकेत

योगेश पायघन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

बचतगटात गुंतवणूक केल्यास महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह निवृत्त विश्वंभर गावंडे (रा. परभणी) याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 14) गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी संशयित सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा. पुंडलिकनगर) हिला अटक करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी सांगितले.

औरंगाबाद - बचतगटात गुंतवणूक केल्यास महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह निवृत्त विश्वंभर गावंडे (रा. परभणी) याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 14) गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी संशयित सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा. पुंडलिकनगर) हिला अटक करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका असलेल्या संगीता दीपक कस्तुरे (30, रा. बायजीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 8 मे रोजी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी पुंडलिकनगरमध्ये त्या नणंद सरिता उमेश बाबरेकर (रा. पुंडलिकनगर) यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची पहिल्यांदा म्हेत्रेसोबत ओळख झाली. म्हेत्रेने सावित्रीबाई फुले महिला बचतगटाच्या वतीने घरगुती वापराच्या महागड्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत दिल्या जातात. हा बचत गटगावंडेंचा असून, ते अधिकारी असल्याने माझ्या नावावर चालवला जातो, असे तिने कस्तुरे यांना सांगितले. कस्तुरे यांनी त्यांच्या पतीसोबत चर्चा करून म्हेत्रेकडे एक बुलेट, फ्रीज व पिठाची गिरणी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. क्रेडिट कार्डवर कर्ज काढून या दांपत्याने जुलैत म्हेत्रेच्या खात्यावर 1 लाख 75 हजार रुपये पाठवले. त्या बदल्यात म्हेत्रेने त्यांना शहागंज येथील किसान मशिनरी या दुकानात गावंडे यांच्या हस्ते पिठाची गिरणीही दिली. गिरणी भेटल्याने त्यांना विश्वास बसला. उर्वरित वस्तू देण्याचे आमिष दाखवून म्हेत्रेने नंतर संपर्काला दाद दिली नाही. दरम्यान, 14 ऑगस्टला दोघेही घराला कुलूप लावून पसार झाल्याने फसवणूक झाल्याचे कस्तुरे यांच्या लक्षात आले. 

अनेकांच्या फसवणुकीचा आरोप

मंगल बडगुजर, संदीप सहाने, दीपाली अवघड, सरिता बाबरेकर, कोमल डहाळे, मीना जोजारे, शुभम मंडलिक, अंकुश शिंदे आशा देशमुख, सतीश अदवंत यांच्यासह अनेक महिलांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे कस्तुरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झाल्यानंतर या महिलांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तक्रारीच्या शहानिशेनंतर झाल्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सहायक निरीक्षक सोनवणे व पथकाने म्हेत्रेला अटक केली असल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of cheats from savings group, crime against retired Deputy Collector, women arrested