Video : मशरुम विक्रीतून वर्षाला लाखोंची कमाई

photo
photo

सेनगाव(जि. हिंगोली) : एमबीए शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने आपल्या काकासोबत वर्षभरापूर्वी कोळसा(ता. सेनगाव येथे लिमरा मशरूम प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून प्रतिमहिना ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. येथील मशरुमला पुणे, मुंबई येथे मागणी असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक मागासलेला तालुका म्हणून सेनगाव तालुक्याची ओळख आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पीक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. या भागात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र जास्त आहे. शेतीला पूरक व्यवसायाची सांगड नसल्याने शेतकरी सतत आर्थिक विवंचनेत सापडत आहे. मात्र, तालुक्यातील कोळसा येथील उच्चशिक्षीत युवकाने शेतीला जोडधंदा म्हणून मशरुम उत्पादन सुरू केले असून यातून लाखो रुपयांची उलाढाल वर्षाला होत आहे.

आवडीच्या व्यवयासाला प्राधान्य

कोळसा येथील सय्यद अयुब सय्यद रसूल हे शासकीय नोकरीत तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपला मुलगा सय्यद अकीबच्या शिक्षणावर भर दिला. सिंहगड येथे एमबीए शिक्षण घेतल्यानंतर अकीब यांनी आपल्या भागात शेती पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा वडीलाकडे व्यक्त केली. शासकीय नोकरीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुलगा अधिकारी व्हावा हे स्वप्न असते. मात्र त्याच्या वडिलांनी तुला व्यवसाय करायचा तो कर मी तुझ्यासोबत आहे, असा धीर दिला. 

यू-ट्यूबवरून माहिती मिळविली

कोळसा येथील अडीच एकर शेतीत तरुण युवकाने काका सय्यद मोबीन यांच्यासोबत मशरूम प्रकल्प सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. सय्यद मोबीन यांचे दुसरीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे सेनगावात काही वर्षापासून मशिनरी वर्कशॉपचे दुकान आहे. त्यांनाही एखादा प्रकल्प सुरू करण्याची तळमळ होती. विशेषता त्यांनी रिकाम्या वेळेत यू ट्यूबवर मशरूम उत्पादनाची भरपूर माहिती घेतलेली होती. काका-पुतणे या दोघांनी लिमरा मशरूमची मुहूर्तमेढ रोवली.

तीस मजुरांना रोजगार उपलब्ध

वर्षभरापूर्वी शेतात ५० बाय २० चे लोखंडी शेड उभारले. परिसरातील शेतकऱ्यांकडून जवळपास एक लाख रुपयांचे सोयाबीनचे कुटार विकत घेतले. बाजारातून मशरूम बियाणे आणले. प्रारंभी दररोज तीस मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. गरम पाण्यात सोयाबीन कुटार उकळून घेणे, त्यानंतर एका बॅगमध्ये दहा किलो कुटार भरले. मशरुमचे बियाणे टाकणे, नियमित ड्रीप द्वारे पाणी देणे, थंड वातानुकूलित वातावरणात ठेवणे, स्वच्छतेची विशेष देखभाल यासह विविध प्रक्रिया सुरू केल्या. मशरूम प्रकल्पासाठी विविध आवश्यक साहित्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च आला आणि प्रकल्प सुरू झाला. अकीबने मशरुमचे अमरावती येथे प्रशिक्षण घेतले होते. 

प्रति महिना ५० हजारांचे उत्पन्न

या प्रकल्पासाठी कृषी विभागाकडून काही मार्गदर्शन मिळेल ही अपेक्षा होती. मात्र मार्गदर्शन तर सोडाच साधी माहितीही मिळाली नाही. मात्र खचून न जाता जिद्द व मेहनतीच्या बळावर या काका-पुतण्यांनी लिमरा मशरूम प्रकल्पासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. दर २१ दिवसाला मशरूम उत्पादित होते. येथील मालाला पुणे-मुंबई, नगर येथे मोठी मागणी आहे. ओली मशरूम तीनशे रुपये; तर सुकी मशरूम एक हजार रुपये किलो दराने विक्री होते. 

विविध आजारांवर फायदेशीर

मागील दोन महिन्यापासून येथे वाळलेल्या मशरूमचे पावडर बनवून विक्री सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मशरूमचा मुतखडा, लिव्हर, किडणी व प्रोस्टेट कॅन्सर रुग्णांना सर्वाधिक फायदा होतो. या प्रकल्पातून सय्यद कुटुंबीयांना प्रतिमहिना जवळपास पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. या प्रकल्पाला तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी उत्सुकतेपोटी आजपर्यंत भेटी देऊन माहिती घेतली आहे. येथे वापर झालेल्या सोयाबीन कुडाचा गांडूळ खत निर्मितीसाठी वापर करीत तो प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.

प्रयत्नाने आर्थिक अडचणीवर मात करता येते

तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र जास्त आहे. शेतीला जोड व्यवसाय करण्याची माझी व माझ्या पुतण्याची जिद्द होती. म्हणून लिमरा मशरूम प्रकल्प एक वर्षापासून सुरू केला. योग्य नियोजन व परिश्रमामुळे चांगले उत्पादन मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसायासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच आर्थिक अडचणीवर मात करता येऊ शकते.
-सय्यद मोबीन, मशरूम, उत्पादक

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com