मराठवाडा वॉटरग्रीडसाठी लागणार पाच वर्षे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

औरंगाबाद - मराठवाड्यातील जनतेला लागणारे १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. १ हजार ३३० किलोमीटर अंतर असलेली ११ लहान-मोठी धरणे एकमेकांशी जोडली जाणार असून, या कामास पाच वर्षे लागतील, अशी माहिती सोमवारी (ता. दहा) पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिली.

औरंगाबाद - मराठवाड्यातील जनतेला लागणारे १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. १ हजार ३३० किलोमीटर अंतर असलेली ११ लहान-मोठी धरणे एकमेकांशी जोडली जाणार असून, या कामास पाच वर्षे लागतील, अशी माहिती सोमवारी (ता. दहा) पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळ आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘वॉटरग्रीडच्या अभ्यासासाठी श्रीलंका, तेलंगणा, गुजरात आणि इस्राईलचा दौरा केला. यासाठी इस्राईलने डीपीआर बनवून दिला असून, पहिल्या टप्प्यातील १० हजार कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.’’ मराठवाड्यातील जनतेचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचे सादरीकरण ग्रीड या संदर्भात मेकोरेट कंपनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले.

या बैठकीमध्ये जनावरांच्या चारा छावण्या, शेळ्या-मेंढ्यांच्या चारा छावण्या, पाण्याचे टॅंकर, पाणीपुरवठा योजना, दुष्काळी अनुदान वाटप, इतर उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अशी असेल यंत्रणा
महत्त्वाची धरणे जोडल्यानंतर प्रत्येक तालुक्‍यात दोन ते तीन ठिकाणांपर्यंत पाणी पोचविण्यासाठी एकूण ३,२२० किलोमीटर पाइपलाइन टाकणे प्रस्तावित आहे. या पाइपलाइनपासून कोणत्याही गावाचे अंतर वीस ते पंचवीस किलोमीटर राहील. त्यामधून सर्व गावांना गरजेच्या वेळी पाणीपुरवठा करता येणार आहे. 

उद्‌घाटनाची घाई 
लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचा प्रारंभ औरंगाबादमधून करणार येणार आहे, असे श्री. लोणीकरांनीच या वेळी सांगितले. दरम्यान, प्रत्यक्षात कामाला कधी सुरवात होईल, हे सांगता येणार नाही; पण आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वीच या कामांचे उद्‌घाटन उरकून घ्यायचे, अशी तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

..म्हणे अभ्यास केला, मग माहिती का देता येईना?
वॉटरग्रीडबाबत बोलताना लोणीकर प्रत्येकवेळी इस्राईलच्या दौऱ्याबद्दलच अधिक सांगतात. मी अभ्यास केला, यावर जोरही देतात; मात्र नेमके या प्रकल्पाबाबत पाइप कसे आणि किती व्यासाचे असतील, ते जमिनीच्या वरतून की जमिनीच्या आतून टाकणार, असे अनेक प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आले; पण याची उत्तरे त्यांना देताच आली नाहीत. खूप हजारांहून अधिक पानांचा डीपीआर आहे, नंतर सांगतो, व्हॉट्‌सॲप नंबर द्या, तुम्हाला प्रेसनोट पाठवितो, अशी थातूरमातूर उत्तरे देत वेळ मारून नेली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Babanrao Lonikar comment