
उदगीर येथील कोविड रुग्णालयात बसवण्यात आलेल्या अद्ययावत एक्स-रे व सिटी स्कॅन यंत्राचे उद्घाटन सोमवारी (ता.३१) राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.
उदगीर (जि.लातूर) : उदगीर येथील कोविड रुग्णालयात बसवण्यात आलेल्या अद्ययावत एक्स-रे व सिटी स्कॅन यंत्राचे उद्घाटन सोमवारी (ता.३१) राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री श्री बनसोडे यांनी स्वतःचा एक्स-रे काढून या विभागाचे उद्घाटन केले. एखाद्या विकास कामाचे उद्घाटन करत असताना अनेक वेळा फक्त औपचारिकता उरकली जाते.
मात्र सोमवारी उदगीरच्या कोविड रुग्णालयात राज्यमंत्र्यांनी केवळ औपचारिक उद्घाटन न करता त्या यंत्राची कार्यक्षमता, त्यासाठी लागणारा वेळ याच बारकाईने निरीक्षण करत स्वतःचा एक्स-रे काढला व या विभागाचे उद्घाटन केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, डॉ.शशिकांत डांगे, डॉ.संजय बिरादार, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, प्रा.श्याम डावळे, समीर शेख, कुणाल बागबंदे आदी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर अधिक, बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के
याप्रसंगी श्री.बनसोडे म्हणाले, या सामान्य रुग्णालयातील व कोविड रुग्णालयातील सर्व रुग्णांना सोनोग्राफी व डिजिटल एक्स-रेचा लाभ मिळावा. हा एक्स-रे काढण्यासाठी जास्त वेळ जात होता. तो कमीत-कमी वेळेमध्ये एक्स-रे काढून सुविधा उपलब्ध करून द्यावी.सामान्य रुग्णालय परिसरातील ट्रामा केअर सेंटरसाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरात-लवकर या कामाची सुरवात करावी. शिवाय आमदार निधीतून पाच रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. येथील रिक्त पदे भरण्यासंदर्भात लवकरात-लवकर प्रस्ताव सादर करावा. त्याचा पाठपुरावा करून पदे भरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सीमा भागासह परिसरातील रुग्णांना जास्तीत-जास्त सुविधा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी सांगितले.
(संपादन - गणेश पिटेकर)