
लातूर ः कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक रीत्या साजरी करण्यावर बंधने आली. त्यामुळे घरातच वेगवेगळे उपक्रम राबवून ही जयंती साजरी केली जात आहे. राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंगळवारी (ता.१४) घरातच कुटुंबासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत जयंती साजरी केली. आज आपण दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या चिंतनासोबतच त्यांच्या जीवनावर आधारित असलेले चित्रपट पाहण्याचा आनंद आपण कुटुंबासमवेत घेणार असल्याचे श्री. बनसोडे यांनी `सकाळ`शी बोलताना सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा आंबेडकरी जनतेसाठी उत्साहाचा दिवस असतो. पण कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा भाग म्हणून टाळेबंदी सुरु आहे. त्यात मंगळवारी (ता.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आली. टाळेबंदीमुळे आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमासोबतच मोठ्या मिरवणुकावरही बंधने आली. त्यामुळे घरातच बसून ही जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे. कुटुंबासमवेत ही जयंती साजरी करण्याची ही सर्वांचीच पहिलीच वेळ आहे. सामान्य नागरिकासारखेच राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देखील मंगळवारी पत्नी शिल्पा, मुले शंतनू आणि सालवी यांच्यासह घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी भंते पय्यानंद उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे त्यांच्या सांगितलेल्या विचारांच्या चिंतनाचा हा दिवस आहे. टाळेबंदी असल्याने आंबेडकरप्रेमी जनतेने घरातच बसून बाबासाहेबांचे स्मरण करावे. मी आज घरातच कुटुंबासमवेत बाबासाहेबांना अभिवादन करून ही जयंती साजरी केली आहे. आम्ही बाबासाहेबांच्या ग्रंथाचे वाचन करणार आहोत. बाबासाहेबांनी समाजाला २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. त्याचे पालन करीत आचारसंहिताही तयार करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक गीत तयार झाले आहेत. त्याच्या कॅसेटही आहेत. हे गीत ऐकणार आहोत. इतकेच नव्हे तर बाबासाहेबांवर निघालेल्या चित्रपट कुटुंबासोबत पाहण्याचा आनंदही घेणार आहे. आंबेडकरी जनतेने देखील घरात बसूनच असे उपक्रम राबवून जयंती साजरी करावी, असे आवाहनही श्री. बनसोडे यांनी यावेळी बोलताना केले.
पालकमंत्र्यांनी घरातच साजरी केली आंबेडकर जयंती
‘कोरोना’मुळे जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाभळगाव येथील निवासस्थानी मंगळवारी (ता.१४) साजरी केली. नागरिकांनी घरी राहून जयंती साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी सर्वत्र गर्दी होते. मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. पण सध्याच्या काळात रस्त्यावर येणे टाळणे पाहीजे, म्हणून सरकारने घरातच जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी सामाजिक अंतर राखत घरातच जयंती साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी विनम्र अभिवादन केले.
सरकारने कोरानाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी तीन मेपर्यंत टाळेबंदीचा कालखंड वाढविला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सामाजिक अंतर या नियमाचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्रित येणे, गर्दी करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरणार नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते, अनुयायी आणि जनतेनेही घरातच थांबून यावर्षी डॉ.आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करावी. सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे पालन करावे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.