
शहरात दुचाकी व बंद घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांनंतर मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या बेसावध ग्राहकांवर लक्ष ठेऊन चोरटे त्यांच्या खिशातील मोबाईल लांबवताना दिसत आहेत. शनिवारी राजीव गांधी चौक परिसरात तासाभराच्या फरकाने दोन मोबाईल चोरीच्या घटना घडल्या.
लातूर : शहराच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडील मोबाईल चोरटे हातोहात लांबवत आहेत. चोरट्यांनी मोबाईल चोरीसाठी गर्दीचे ठिकाणे टारगेट केल्याने रोज चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. चोरी झाली असतानाही काही पोलिस ठाण्यात मोबाईल हरवल्याची व गहाळ झाल्याचीच तक्रार घेण्यात येत आहे. यामुळे चोरट्यांना मोकळे रान सापडले असून, शनिवारी (ता. १४) राजीव गांधी चौकात तासाभराच्या फरकाने दोन मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. लक्ष्मीपूजनासाठी फुले खरेदी करणाऱ्या दोघांच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी लांबवले.
शहरात दुचाकी व बंद घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांनंतर मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या बेसावध ग्राहकांवर लक्ष ठेऊन चोरटे त्यांच्या खिशातील मोबाईल लांबवताना दिसत आहेत. शनिवारी राजीव गांधी चौक परिसरात तासाभराच्या फरकाने दोन मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. अभिजित श्रीशैल्य पुजारी (रा.राधाकृष्णनगर) हे चौकातील शासकीय विश्रामगृहासमोर लक्ष्मीपूजनासाठी फुले करत असताना त्यांच्या पँटच्या डाव्या खिशातील नोट प्रो कंपनीचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी सकाळी नऊ वाजता चोरून नेला. या प्रकरणी विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तासाभरातच याच परिसरात दुसरी घटना घडली.
सत्यवान श्रीराम देशपांडे (रा. नारायणनगर) हे गाड्यावर फुले खरेदी करत असताना त्यांच्या पॅंटच्या उजव्या खिशातील सॅमसंग कंपनीचा दहा हजार रुपये कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना काही पोलिस ठाण्यात मात्र मोबाईल चोरीची तक्रार घेतली जात नाही.
मोबाईल हरवल्याची किंवा गहाळ झाल्याची तक्रार घेऊन तातडीने तपास करण्याचे आश्वासन पोलिस देत आहेत. दिवसेंदिवस तपास लागत नसलेल्या नागरिकांना चोरट्यांनी अजून मोबाईल सुरूच केला नाही, आम्ही ट्रॅंकिंगवर टाकला आहे, असे गोलगोल उत्तरे दिली जात आहेत. तंत्रज्ञान पुढे गेल्याचा कांगावा केला जात असताना चोरी गेलेले मोबाईल नेमके जातात कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घर व दुचाकीसोबत नागरिकांना आता मोबाईल चोरीची धास्ती वाटत आहे.
मोबाईल चोरांची टोळीच
एका महसूल कर्मचाऱ्याचा मोबाईल तीन ऑक्टोबरला सकाळी पावणेआठ वाजता भाजीमंडईतून चोरीला गेला. गांधी चौक पोलिसांनी मोबाईल हरवल्याची तक्रार घेतली. या कर्मचाऱ्याने बाजूच्या दुकानातून सीसीटीव्ही फुटेज मिळवत पोलिसांना दिले. फुटेजमध्ये तिघांनी संगनमत करून मोबाईल पळवल्याचे दिसत आहे. यातील एकाचा चेहरा स्पष्ट दिसत असून, बाकींच्याचे चेहरे मास्कमुळे ओळखू येत नाही. तिघांपैकी एकजण गर्दीतून जवळ येऊन खेटला. दुसऱ्याने खिशातील मोबाईल काढून तिसऱ्याकडे सोपवल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. यावरून मोबाईल चोरांची टोळीच शहरात सक्रिय असल्याचे दिसत आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले