परभणीत नवीन विद्युत मिटर बसविण्यापुर्वीच त्यामध्ये फेरफार ? 

गणेश पांडे 
Friday, 25 December 2020

परभणी शहरात जिनस कंपनीचे विद्युत मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु मिटर लावण्यापुर्वीच फेरफार केला जात असल्याची चर्चा असून फेरफार करण्यासाठी एजन्सीचे कर्मचारी पैसे मागत असल्याचे बोलले जात आहे. 

परभणी : शहरात जिनस कंपनीचे विद्युत मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु मिटर लावण्यापुर्वीच फेरफार केला जात असल्याची चर्चा असून फेरफार करण्यासाठी एजन्सीचे कर्मचारी पैसे मागत असल्याचे बोलले जात आहे. मिटर बदलण्याच्या प्रक्रीयेवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे कुपंनच शेत खात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. 

शहरातील विद्युत ग्राहकांचे जुने मीटर काढून नवीन जिनस कंपनीचे मीटर लावण्याचे काम कंत्राटदार एजन्सीकडून केले जात आहे. या मिटरमुळे मिटर रिडिंग थेट महावितरणच्या कार्यालयातील प्रणालीवर दिसणार असून तत्काळ विद्युत देयके मिळणार असल्याचे मिटर बदलाचे कारण सांगितले जात आहे. शहरात सर्वत्र सदरील एजन्सीचे कामगार, कर्मचारी मिटर बदलण्याचे काम करीत आहेत. 

ग्राहकांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न 
मीटर बदलण्यासाठी सदरील कंत्राटदार एजन्सीचे कर्मचारी घरोघरी फिरत असून विद्युत ग्राहकांची अगोदर मोठ्या लाघवी भाषेत संवाद साधत आहेत. तुम्हाला कसे मिटर पाहिजे, हे मीटर खूप गतीने फिरते, बिल जास्त येते, असे सांगून अगोदर ग्राहकांच्या मनात भिती निर्माण केल्या जाते. परंतू, काही घाबरण्याचे कारण नाही, आम्ही मिटरला सॉफ्टवेअर मारले तर गती कमी होते व त्यामुळे बिल देखील कमी येते, सील लावण्यापुर्वीच सॉप्टवेअर मारल्यामुळे कुणाला काही समजणार देखील नाही, असे म्हणून त्यासाठी वसाहतीनिहाय एक ते तीन हजार रुपयाची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही झालेच तर आम्ही आहोत, आमचा मोबाईल नंबर घ्या, असे म्हणून ते कर्मचारी भ्रमित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - लक्ष्मी नृसिंह शुगर्सकडून सव्वालाख साखर पोत्याचे उत्पादन- चेअरमन राजेंद्र नागवडे

वसाहतीनिहाय वेगवेगळे दर 
वसाहतीचे स्वरुप कसे आहे, यावरून फेरफार करण्याचे दर लावल्या जात आहे. छोट्या वसाहती असतील तर एक ते दिड हजार, मध्यम असतील तर दोन हजार व उच्चभ्रू असतील तर तीन हजार रुपये दर सांगीतले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वास्तविक पाहता या मिटवरच लिहलेले आहे. ‘सावधान, मिटरला फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास अधिकतम वेगाने वीज नोंदणी होणार’, तरी देखील ग्राहक आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून येते. 

हेही वाचा - नियोजित नांदेड- तांडूर- परभणी रेल्वेला रायचूरपर्यंत वाढवा- प्रवाशी महासंघ

फेरफार केलेले मिटर बसवल्याची शक्यता 
सदरील एजन्सीच्या कर्मचारी फेरफार केलेलेच मिटर घेऊन फिरत असतांना दिसून येत आहेत. एखाद्या ग्राहकाने असे फेरफार केलेले मिटर नको म्हटल्यास, त्यांना नंतर साधे मिटर घेऊन येतो म्हणून सांगितले जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक विद्युत ग्राहकांना असे टॅंपरींग केलेले मिटर बसवले जाण्याची अधिक शक्यता आहे. ज्यांनी फेरफार करण्यास नकार दिला, त्यांच्याकडे मिटर बसवण्याचे पाचशे रुपये देखील मागितले जात आहेत. वास्तविक पाहता, मिटर बसवण्यासाठी महावितरणकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. मिटर हे निशुल्क दरात बसवण्याचे आदेश असल्याची माहिती आहे. तरी देखील बसवण्यासाठी, त्यामध्ये फेरफार करण्यासाठी पैसे मागीतले जात असल्याची बाब धक्कादायक आहे. कुंपनानेच शेत खाण्याचा हा प्रकार असून या कंपनीने बसवलेल्या सर्व मिटरचे पुन्हा त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडीट होणे गरजेचे आहे. तेव्हाच त्या मिटरमध्ये काय फेरफार केला हे समजून येणार आहे. अन्यथा महावितरणचे मोठ्या प्रमाणातक आर्थिक नुकसान होणार आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modification before installing new electricity meter in Parbhani?, Parbhani News

फोटो गॅलरी