श्रावण सोमवारी वैद्यनाथाच्या दर्शनाला भावीकांची गर्दी

लक्ष्मण वाकडे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

परळी वैजनाथ (जि.बीड) : 'हर हर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय...चा जयघोष करत तिसऱ्या श्रावण सोमवार (ता.27) येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांचा जनसागर उसळला. सायंकाळपर्यंत दोन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. 
गेल्या दोन श्रावण सोमवारांच्या तुलनेत आज भाविकांची मोठी गर्दी होती. पहिल्या श्रावणी सोमवारी लाखावर भाविकांनी, दुसऱ्या सोमवारी दीड लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. शिवाय दररोज श्रावणानिमित्त दर्शन घेणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे.

तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे काकडा आरती, अभिषेक पूजा होवून दर्शनाला सुरूवात झाली. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती. दर्शनासाठी स्त्री, पुरूष भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगा होत्या. शिवाय शंभर रूपये देणगी देवूनही विशेष दर्शनपासची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन व्यवस्थेचे काम चोख व्हावे व भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून देवस्थान संस्थेचे सचिव राजेश देशमुख व त्यांचे सहकारी, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

सायंकाळीही मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. अनेक भाविकांनी दर्शन घेण्याबरोबरच वैद्यनाथ प्रभूची रूद्राभिषेक पूजाही केली. तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त बेल, फुल, श्रीफळ भाविकांनी 'श्री'स अर्पण केले. शिवाय मुगाची शिवमुठही अर्पण केली. मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर बेल, फुल, प्रसादाची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. परळी परिसरातील गोदावरी नदी काठावरील अनेक भाविक गंगेच्या पाण्याने 'श्री'ची पूजा करतात. अनेक भाविक पायी चालत येवून श्रावणात दररोज गंगेचे जलअर्पण करून पूजा करतात. त्यास 'वैद्यनाथाची कावड' असे म्हणतात. दर्शन व्यवस्था चोख व्हावी यासाठी शंभरावर सी.सी.टी.व्ही.कॅमेर्‍याद्वारे संपूर्ण दर्शन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात आले होते. शिवाय मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करण्यात आला होता.

परळी शहरातील संत जगमित्र नागा, सुर्वेश्वर मंदिर, परिसरातील जिरेवाडी येथील सोमेश्वर, सिरसाळा परिसरातील तपोवन, टोकवाडी येथील रत्नेश्वर, धर्मापूरी येथील केदारेश्वर, मल्लिकार्जून, गाढेपिंपळगाव, बेलंबा, नाथरा आदी ठिकाणच्या प्राचीन शिवमंदिरातही जावून अनेक भाविकांनी श्रावण सोमवारनिमित्ताने दर्शन घेतले, पूजाअर्चा केली.

Web Title: on Monday show the crowd of devotees to Vaidyanatha