तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे, मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न

जलील पठाण
Thursday, 3 September 2020

खरिपातील अल्पकाळात उत्पादन देणारे पीक म्हणून उडीद आणि मुगाची पेरणी औसा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी करतात. यंदा जेमतेम पावसावर ही पिके चांगली आली. भरघोस वाढ आणि भरपूर फळधारणा असल्याने शेतकरी सुखावला असतांना गेल्या महिन्यात पंधरा दिवस पडणाऱ्या भुरभुर पावसाने काढणीस आलेल्या या दोन्ही पिकांचे मातेरे झाले आहे.

औसा (जि.लातूर) : खरिपातील अल्पकाळात उत्पादन देणारे पीक म्हणून उडीद आणि मुगाची पेरणी औसा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी करतात. यंदा जेमतेम पावसावर ही पिके चांगली आली. भरघोस वाढ आणि भरपूर फळधारणा असल्याने शेतकरी सुखावला असतांना गेल्या महिन्यात पंधरा दिवस पडणाऱ्या भुरभुर पावसाने काढणीस आलेल्या या दोन्ही पिकांचे मातेरे झाले आहे. यातून घातलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

शेतकऱ्यांच्या या संकट काळात सरकारने मदतीचा हात द्यावा यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार, लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांची मागणी केली आहे. औसा तालुक्याचे खरिपाचे एकूण क्षेत्र एक लाख अकरा हजार हेक्टरच्या वर आहे. यामध्ये साठ ते सत्तर हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. यंदा तालुक्यात मूग २५ हजार आठ, तर उडीद २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले आहे.

भारनियमन पाचवीला पुजलेलेच; त्यात वीज जोडणी मिळेना, शेतकऱ्यांच्या नशीबी मरण...

मूगात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कमी दिवसांत येणारे पीक म्हणून मूग व उडदाची लागवड केली.ही  पिके घेण्याचे अजून एक कारण म्हणजे घरात लागणारी डाळही याच उत्पादनातून स्वस्तात होते आणि पिक लवकर निघत असल्याने रब्बीचे पिक लवकर पेरता येते. मात्र मूग, उडीद घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदा शेंगा पक्व होतांना सतत पडणाऱ्या भुरभुरीने पानावर व शेंगावर करपा आला आणि अनेक दाण्यांना शेंगांमध्येच कोंब फुटले. दाणे काळपट पडून अडकन जास्त झाल्याने या पिकाची काढणीही आता परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. काळा पडलेला माल बाजारात घेतला जात नाही आणि घेतला तर तो मातीमोल भावाने घेतला जात असल्याने शेतकरी धास्तवाला आहे. दरम्यान आमदार अभिमन्यू पवार आणि माजी खासदार या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा अशी मागणी सरकारकडे केली आहे.

बेरोजगार तरुणांचा डिग्री जलाओ आंदोलन, शिक्षक दिनी होणार भक्षक दिन साजरा

अडीच एकरवर मुगाची लागवड केली होती. परंतु सतत पडणाऱ्या रिपरिपने मुगाचे पार मातेरे झाले आहे. आता काढणीचाही खर्च निघत नसल्याने पुढे काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी.

 शफी शेख. शेतकरी औसा

(संपादन - गणेश पिटेकर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moong, Udad Grower Farmers In Trouble Latur News