फोटो
फोटो

अपहरण केलेला बाळ दिसताच आईचा हंबरडा

नांदेड : विश्‍वासाने मैत्रीणीने सांभाळण्यासाठी दिलेल्या तिच्या पाच महिण्याच्या बालकाचे अपहरण करून किनवट गाठलेल्या महिलेला पोलिसांनी बालकासह गुरूवारी (ता. १९) डिसेंबर रोजी तिला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा किनवट पोलिसांनी बालकासह त्या महिलेला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले. 

ठाणे जिल्ह्यातील नवघर पोलिस ठाण्यातंर्गत राहणाऱ्या संगिता सुनीलराज भारद्वाज ही महिला आपल्या पतीसह राहते. तिने आपल्या निराधार असलेल्या मैत्रीणीला आपल्या शेजारी ठेवले. त्या मैत्रीणीला एक चार वर्षाची मुलगी व पाच हिण्याचा अभयसिंह हा मुलगा आहे. कामावर जाण्यासाठी त्या बालकाला तिने विश्‍वासाने संगिता हिच्याकडे ठेवले. त्यानंतर ती कामाला निघून गेली. मात्र या बालकाचे अपहरण करण्याचा डाव या दामप्त्याने रचला व त्या बालकाला घेऊन त्यांनी किनवट तालुक्यात असलेल्या बोधडी (बु) येथील एका नातेवाईक महिलेचे घर गाठले. त्या दरम्यान तिकडे बालकाच्या आईच्या फिर्यादीवरुन संगिता व तिच्या पतीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. 

किनवट पोलिसांचे कौतुक 
 
तर इकडे किनवट पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांनी आपले सहकारी श्री. गडपवार, अनिता गजलवाड, होमगार्ड सय्यद, श्रीमती पिसलवाड या पथकासह त्या महिलेला पकडण्यासाठी सापळा लावला. ती आपली एका नातेवाईकाकडे लपून बसल्याची माहिती किनवट पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी (ता. १८) सायंकाळी उशिरा तिचा शोध घेतला. मात्र रात्र झाल्याने तिला तिच्या बहिणीच्या ताब्‍यात ठेवून नोटीस दिली. तरीही तिच्यावर पोलिसांनी रात्रभर पाळत ठेवली.

गुरूवारी सायंकाळी बालक आईच्या कुशीत

गुरूवारी (ता. १९) सकाळी त्या बालकाला व संगिता भारद्वाज हिला ताब्यात घेऊन किनवट पोलिस ठाण्यात स्थानबध्द केले. किनवट उपजिल्हा रुग्णालयात बाळाची तपासणी करून बाळ सुरक्षीत असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर सर्व माहिती घेऊन एपीआय श्री. कांबळे यांनी नवघर (जिल्हा ठाणे) पोलिसांशी संपर्क साधला. आपल्या गुन्ह्यातील अपहरणकर्ती महिला व बालक आमच्या ताब्यात सुरक्षीत असल्याचे कळविले. सायंकाळी उशिरा नवघर पोलिस किनवटमध्ये आल्यानंतर त्या दोघांनाही त्यांच्या ताब्यात दिले. एक मैत्रीणीचा विश्‍वासघात करणाऱ्या या महिलेवर अजून काही गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी नवघर पोलिस करणार असल्याचे सांगण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com