लोहारा (जि. धाराशिव) - लोहारा तालुक्यातील सास्तूर येथून वाहणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातील पाण्यात बुडून माय लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (ता. १५) दुपारी एकाच चितेवर मायलेकींना भडाग्नी दिला. या घटनेमुळे सास्तूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अलका उमाकांत माने (वय ३६), निकिता माने (वय १६) अशी मयतांची नावे आहेत.
मयत अलका व त्यांची मुलगी निकिता या दोघी शुक्रवारी (ता. १४) शेताकडे गेल्या होत्या. शेतात गेल्यानंतर हरभऱ्याचे डहाळे खाण्याचा त्यांनी बेत केला. उन्हाळी पिकांसाठी निम्न तेरणाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे डहाळे धुण्यासाठी मायलेकी कालव्याकडे गेल्या. डहाळे धुवत असतांना अलका यांचा अचानक तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या.
आईला वाचविण्यासाठी मुलगी निकितानेही कालव्यात उडी मारली. याची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कालव्याकडे धाव घेतली; परंतु पाण्याचा प्रवाह असल्यामुळे मायलेकींना वाचवता आले नाही. यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तत्काळ निम्न तेरणेच्या उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यास सांगितले.
पाणी बंद केल्यानंतर दीडएक तासानंतर आई अलका यांचा मृतदेह आढळला; परंतु मुलगी निकिताचा शोध लागला नाही. अथक प्रयत्नानंतर रात्री सव्वाबाराच्या सुमारास कालव्याच्या बाजूस असलेल्या झुडपात निकिताचा मृतदेह मिळून आला. सहायक पोलिस निरीक्ष ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस हवलदार विठ्ठल ढवण, आकाश भोसले यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, रात्री उशिरा मुलीचा मृतदेह सापडला. शनिवारी (ता. १५) सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निकिता शाळेत अत्यंत हुशार होती. सध्या ती दहावी बोर्डाची परीक्षा देत होती. परीक्षेच्या पेपरला शुक्रवारी धुलीवंदनाची सुट्टी असल्यामुळे निकिता आपल्या आईसोबत शेताकडे गेली होती. निकिताला पोहवता येत होते. त्यामुळे तीने कालव्यात पडलेल्या आईला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली; परंतु घाबरलेल्या आईने निकिताला एकदम घट्ट मिठी मारल्यामुळे दोघींचा करुण अंत झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.