औरंगाबादेत आयुक्त बदलीसाठी हालचाली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

महापौर- नवे सरकार येताच योग्य तो निर्णय

औरंगाबाद- महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कारभाराविषयी महापालिकेत नाराजी वाढत आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रारही केली आहे. नवे सरकार येताच, आयुक्तांबाबत योग्य तो निर्णय होईल, यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे झाले आहे, असे सूचक वक्तव्य शुक्रवारी (ता. एक) महापौरांनी केले. 

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे वारंवार सुटीवर जातात. शहरात असले तरी महापालिकेत न येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातून कामकाज पाहतात. सर्व अधिकार बहाल केल्यामुळे मी हजर असणे आवश्‍यक आहे का? असा प्रश्‍न आयुक्तच करतात. त्यामुळे महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. आयुक्तच मोबाईल वापरत नसल्याने अधिकारीदेखील नगरसेवकांचे फोन घेत नाहीत. शहर बस, कचरा प्रक्रिया प्रकल्प अशी बोटावर मोजण्याएवढी कामे सोडली तर गेल्या वर्ष दीड वर्षापासून अनेक कामेही ठप्प आहेत. त्यात ऐन दिवाळीच्या सणात कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय न घेता आयुक्त सुटीवर गेले. जाता जाता त्यांनी महापालिकेत मोठ्या संख्येने बदल्या करीत खळबळ उडवून दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी थेट मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत महापालिकेसाठी विशेष अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. यासंदर्भात शुक्रवारी महापौर म्हणाले, अनेक कामे प्रशासनाची योग्य साथ मिळत नसल्यामुळे रखडली आहेत. त्यामुळे राज्यात युतीचे सरकार स्थापन होताच महापालिकेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी निर्णय होईल. यासंदर्भात पालकमंत्र्यांसोबत आपली चर्चा झाल्याचे महापौरांनी नमूद केले. 
 
प्रभारी आयुक्तांनी रोखल्या बदल्या 
आयुक्त डॉ. निपुण यांनी सुटीवर जाताना अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, तसेच दोन अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीही दिली. त्यामुळे महापालिकेचा कारभार ठप्प होण्याची शक्‍यता आहे. या बदल्यांबरोबरच शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, दुय्यम आवेक्षक यांच्याही बदल्यांचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. या आदेशावर आयुक्तांची सहीदेखील झाली आहे; मात्र आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या बदल्यांमुळे प्रशासनात पुन्हा गोंधळ उडेल, असे महापौरांचे म्हणणे आहे. त्यांनी प्रभारी आयुक्तांसोबत चर्चाही केली. त्यामुुळे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी डॉ. निपुण विनायक यांचे आदेश सध्यातरी बाजूला ठेवले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movements Commissioner Transfers