खासदार दत्तक गाव; पाण्याचा नाही ठाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

मतदारसंघातील बार्शी, उमरगा, औसा या तीन तालुक्‍यांतील तीन गावे दत्तक घेतली आहेत. कारला येथे काम सुरू केलेले नाही.
- खासदार प्रा. रवींद्र गायकवाड.

किल्लारी - आदर्श बनविण्यासाठी खासदारांनी दत्तक घेतलेल्या कारला (ता. औसा) या सहा हजार लोकसंख्येच्या गावात पाण्याचा ठावठिकाणा नसल्याची सद्यःस्थिती आहे. दहा दिवसांआड एकवेळ म्हणजे महिन्यातून तीनदा पाणी मिळते. कूपनलिका अधिग्रहणासह टॅंकरचीही सुविधा या गावात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे.

मागच्या प्रलयकारी भूकंपात गावचे पुनर्वसन झाले नसल्याने आहे तेथेच लोक राहतात. गाव दोन ठिकाणी वसले आहे. गावात दोन आड असून ते कोरडे आहेत. काही ग्रामस्थांना शेतातील खासगी कूपनलिकांतून सायकल, हातगाडे घेऊन पाणी मिळवावे लागते. ग्रामपंचायतीने दोन विंधनविहीरी अधिग्रहीत करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी मिळाली नाही.

ग्रामपंचायतीच्या सहा विंधन विहिरींपैकी एक सुरू आहे. एका हातपंपावर वीस घागरी पाणी मिळते. इतर सर्व हातपंप बंद आहेत. ‘जलस्वराज’ अंतर्गत तीनपैकी एका विहिरीचे पाणी दिवसाला चार तास मिळते. ते व विंधन विहिरीचे एकत्र करून दहा दिवसांआड एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. नळाला पाणी येताच ग्रामस्थांची गर्दी होते. टंचाई निवारणा अंतर्गत एक विंधन विहीर मंजूर झाली असली तरी प्रतीक्षा आहे. काही जुन्या कूपनिलाकांचे नूतनीकरण आवश्‍यक आहे. 

गाव आदर्श बनविण्यासाठी खासदार रवींद्र गायकवाड यांनी कारला दत्तक घेतले होते. जिल्हाधिकाऱ्यांचे तसे पत्रही ग्रामपंचायतीला आले होते. ‘आदर्श’ अंतर्गत घरांच्या नोंदी, स्वच्छतागृहांची संख्या, तंबाखू खाणारे, दारू पिणारे, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, घरकुल आदी बाबींच्या सर्वेक्षणासाठी सरंपच, ग्रामविकासाधिकारी, कर्मचारी महिनाभर व्यस्त होते. अहवालांचे पाच प्रतीत बंच, मागणीनुसार कागदपत्रे देणे आदींसाठी ग्रामपंचायतीलाच तीस हजारांवर खर्चही आला. एवढे करून गाव अद्याप आदर्श बनलेले नाही. ग्रामपंचायतीला मात्र खर्च करावा लागला. पाणी, रस्ता, वीज आदी सुविधा प्राधान्याने मिळायला हव्या होत्या. त्यांचाच पत्ता नाही.

घागरभर पाण्यासाठी काही ग्रामस्थांना रोजगार बुडवून रानोमाळ फिरावे लागत आहे. माकणी धरनातून निलंग्याकडे गेलेली वाहिनी गावातून जात आहे. तिच्या व्हाल्व्ह व लिकेजवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होते. कामाला गेले तर अडिचशे रुपये मिळतात. त्यातील दीडशे रुपयांचे पाणी घ्यावे लागते. पाण्याची व्यवस्था असती तर ते वाचले असते, असे काही ग्रामस्थ सांगतात. सध्याच्या दुष्काळात तरी शासनाने किमान दोन विंधनविहिरींचे अधिग्रहण करावे, टॅंकरची व्यवस्था करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

अधिग्रहणाचा दिलेल्या प्रस्ताव मंजूर झाला नाही. सध्या उपलब्ध पाणी एकत्र करून महिन्यातून तीनवेळा देत आहोत. तेही दहा मेपर्यंत पुरेल. टॅंकरसाठी पाठपुरावा सुरू आहे. खासदारांनी गाव दत्तक घेतले असले तरी कामे झालेली नाहीत. तसा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे.
- डॉ. डी. के. गोळे, सरंपच

गाव कोणी दत्तक घेतले हे माहीत नाही. पारधेवाडी शेजारी जाऊन पाणी आणतो. जनावरांना पाणी मिळतच नाही. निलंग्याकडे जाणाऱ्या वाहिनीवरील व्हाल्व्हवर तहान भागवतो. गावात पाणी, रस्ता आदी कोणत्याच सुविधा नाहीत.
- महेबूब बाशा पठाण, ग्रामस्थ

गाव दत्तक घेतले की काय, ते काही माहीत नाही. माझ्या घरात अनेक दिवसांपासून पाणी नाही. वय झालं आहे. त्यामुळे वाहत्या नाल्यातील पाणी पिऊन दिवस काढते.
- रुक्‍मिणबाई घोडके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Adopt Village Karla Development Issue Water Shortage