औरंगाबाद : पोलिस ठाण्यासमोर एमआयएम कार्यकर्त्यांचा राडा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

खासदार इम्तियाज यांना धक्काबुक्की प्रकरण, कदीर मौलाना, अज्जू पहेलवान ताब्यात 
 

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना यांना जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. 21) रात्री ताब्यात घेतले. यादरम्यान एमआयएम कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी व राडा केल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावाला
पांगविले. 

कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्कीनंतर कटकट गेट येथे तणाव झाला होता. सायंकाळनंतर एमआयएम कार्यकर्त्यांचा जमाव कदीर मौलाना यांच्या घरावर चालून गेला; परंतु पोलिसांची कुमक तेथे असल्याने कार्यकर्त्यांना त्यांनी हुसकावून लावले. यानंतर हाच जमाव जिन्सी पोलिस ठाण्यासमोर आला. तेथे जमावाने
घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी एमआयएम कार्यकर्त्यांना आधी समाजावून सांगितले; पण तरीही कार्यकर्ते आक्रमकच होते. म्हणून पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर जमाव पांगला. यादरम्यान कदीर मौलाना व अज्जू पहेलवान यांना जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची
प्रक्रिया सुरू होती. 
  
दोघांच्या घरांना संरक्षण 
मध्यचे उमेदवार कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्या घरांभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विरोधी गटांनी त्यांच्या घरांवर हल्ला करू नये म्हणून हा खबरदारीचा उपाय करण्यात आला आहे. 
 
पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप 
एमआयएम कार्यकर्त्यांचा राग लक्षात घेता राखीव पोलिस बल, जलद कृती प्रतिसाद पथकासह ठाण्याची कुमक तैनात करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखा
निरीक्षक मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे हेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 
 
आम्ही कुणालाही मारलं नाही : कदीर मौलाना 
आम्ही कुणालाही मारलं नाही. उलट इम्तियाज जलील यांनीच आम्हाला मारहाण केली. त्याबाबतची व्हिडिओ क्‍लिपसुद्धा समोर आली आहे, असा आरोप कदीर मौलाना यांनी केला. ते म्हणाले, "एमआयएमचे काही लोक शहरात बोगस मतदान करीत होते. त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एमआयएमकडून मारहाण झाली आहे. त्यानंतर सायंकाळी इम्तियाज जलील यांनीसुद्धा कटकट गेट परिसरात येऊन आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला; तेव्हा मी तिथे गेलो. त्यावेळी जलील हे माझ्यावरसुद्धा धावून आले. खासदार पदावर बसलेल्या व्यक्तीला हे वागणं शोभत नाही. त्यांच्याविरोधात आम्ही तक्रार देणार आहोत.'' 

राड्यामागे शिवसेना-भाजपचा हात : इम्तियाज जलील 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना हे सकाळपासून "एमआयएम'च्या उमेदवारासह पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा वाटप केला असून, तो पैसा शिवसेना-भाजप नेत्यांनी पुरविला आहे. शिवाय या प्रकाराला सत्ताधाऱ्यांकडून पाठबळ देण्यात आल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.  राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इम्तियाज म्हणाले, "औरंगाबाद मध्य मतदारसंघात खूप पैसा वाटप झाला. आमच्या उमेदवारावर सकाळपासून दबाव आणला जात असल्याचे समजल्यानंतर स्वत: मी पोलिस अधिकाऱ्यांना याप्रकरणात लक्ष देण्यास सांगितले होते; मात्र राष्ट्रवादीला शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मदत केली. शिवाय पोलिस प्रशासनानेदेखील संबंधितांना मोकळीक दिली, असल्याची टीकाही त्यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP beaten case Aurangabad