राज्यस्तरीय हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील 

राजेश दारव्हेकर
Wednesday, 9 September 2020

हिंगोली येथे हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावे याकरिता खासदार हेमंत पाटील मागील अनेक दिवसांपासून केंद्र, राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

हिंगोली : राज्यातील हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी राज्यशासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

हिंगोली येथे हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावे याकरिता खासदार हेमंत पाटील मागील अनेक दिवसांपासून केंद्र, राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याबाबत  राज्यशासनने २२ जुलै रोजी  बैठक आयोजित करून अभ्यास समिती गठीत करणार असल्याचे सांगितले होते, त्यानुसार अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. 

राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना  त्याचा मोठा फायदा होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत

राज्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, सांगली , सातारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक  मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतू प्रक्रिया ,साठवणूक आणि विक्रीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने राज्यातील हळद इतर राज्यामध्ये निर्यात केली जाते, हळदीच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्री पर्यंत सर्व सुविधा राज्यातच उपलब्ध झाल्यास राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना  त्याचा मोठा फायदा होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि हळद लागवडीपासून प्रक्रिया व विक्री पर्यंत येणाऱ्या अडचणी विचारात घेता खासदार हेमंत पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय संसदीय वाणिज्य समिती आणि  राज्यशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच या अनुषंगाने २२ जुलै रोजी राज्यशासनाने बैठक आयोजित करून  लवकरच हळद संशोधन आणि प्रक्रिया यावर अभ्यास समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते त्याच बैठीकीची फलश्रुती म्हणून अभ्यास समिती गठीत करण्यात येणार आहे. 

अध्यक्षपदाच्या निवडीमुळे हिंगोली येथील हळद संशोधन प्रक्रिया महामंडळाचा मार्ग मोकळा

या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची तर सचिवपदी कृषी आयुक्तालय पुणे, विभाग ( फलोत्पादन ) संचालक यांची निवड केली आहे. तर सदस्य म्हणून पुणे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह , परभणी ,दापोली, राहुरी या कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, स्पाईसेस बोर्डाचे  उपसंचालक ,हळद आयात-निर्यात संघाचे प्रतिनिधी,  महाराष्ट्र कृषी उद्योग आणि महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळाचे  प्रतिनिधी, पणन मंडळाचे संचालक ,अन्न औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी,  हळद उत्पादक शेतकरी, हळद उत्पादक, प्रक्रिया शेतकरी उत्पादक कंपनी यांची निवड करण्यात आली आहे. ही  समिती राज्यातील हळद उत्पादक शेतकरी , यांच्याशी  संपर्क साधून लेखी अथवा प्रत्यक्ष स्वरूपात समस्या मागवून त्यावर सखोल चर्चा करून करून त्यावर  काय उपाययोजना करता येतील याबाबतचा आवाहल शासनास सादर करणार आहे. खासदार हेमंत पाटील  यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे हिंगोली येथील हळद संशोधन प्रक्रिया महामंडळाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Hemant Patil as the Chairman of the State Level Turmeric Research and Process Study Committee hingoli news