
महावितरणकडून ४७ एजन्सी बडतर्फ
पुणे : लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या चार महिन्यांपासून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे. तर त्यापैकी ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्यातील एका एजन्सीचा तर नांदेड परिमंडलातील सर्वाधिक दहा एजन्सींचा समावेश आहे.
वीजबिल रीडिंगचा आढावा घेताना १०० टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे आढळून आले. त्याची दखल घेत राज्यातील सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे महावितरणचे अध्यक्ष विजयकुमार सिंघल यांनी आढावा बैठक घेतली होती. महावितरणच्या सुमारे २ कोटी १५ लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीद्वारे करण्यात येते. या एजन्सीजने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून आले. त्यानंतर मीटर रीडिंगच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे.
विभागवार बडतर्फ केलेल्या एजन्सी
नांदेड परिमंडलातील १०, जळगाव - ८, अकोला - ७, लातूर, कल्याण, बारामती व नाशिक - प्रत्येकी ४, औरंगाबाद - २, तर पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती या परिमंडलातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
Web Title: Mseb 47 Agencies Customers Incorrect Meter Readings As Per Electricity Use
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..