esakal | महावितरणचा कंत्राटी तंत्रज्ञ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; सहायक अभियंत्यासाठी घेत होता लाच 

बोलून बातमी शोधा

file photo}

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : दोघांवर गुन्हा दाखल : सहाय्यक अभियंता फरार

महावितरणचा कंत्राटी तंत्रज्ञ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; सहायक अभियंत्यासाठी घेत होता लाच 
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्विकारताना कंत्राटी तंत्रज्ञ जाळ्यात सापडला. सोमवारी (ता. एक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान मुख्य संशयित आरोपी सहाय्यक अभियंता फरार झाला.

सदरील प्रकरणात एका पंचवीस वर्षीय युवकाने तक्रार दिली होती. त्यावरुन सापळा रचून शहरातील महावितरण शाखा कार्यालय ग्रामीण- २ ( बोरी ) चे सहाय्यक अभियंता श्रेणी २, सुधाकर दगडूजी जाधव ( वय ४६ वर्षे) आणि कंत्राटी तंत्रज्ञ बाळासाहेब विनायक बुधवंत ( वय ३१ वर्ष) यांना लाचेची एक हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.️

लाचेची मागणी ता. १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. तक्रारदार व्यक्तीने शक्ती कंपनीतर्फे सोलर पंप बसवलेले असून त्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी लागणाऱ्या आयसीआर फॉर्मवर सही घेण्याकरिता दोघांनी प्रति फॉर्म पाचशे रुपये याप्रमाणे एक हजार रुपये तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. ती कंत्राटी तंत्रज्ञ बाळासाहेब बुधवंत याने सोमवारी पंचासमक्ष सहायक अभियंता सुधाकर जाधव यांच्याकरिता स्विकारली असता त्यास ताब्यात घेतले असून सुधाकर जाधव हे फरार आहेत. 

याप्रकरणी सांयकाळी येथील पोलिस ठाण्यात दोन्ही संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.️ नांदेड परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी परभणी उपअधीक्षक भरत के. हुंबे, पोलिस निरीक्षक अमोल कडू, पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने  सापळा रचून यशस्वी कारवाई केली.
पथकात️ पोलिस जमिल जागीरदार, पोलिस नायक अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद, शेख मुखतार, माणिक चट्टे, सावित्री दंडवते, सारिका टेहरे, चालक रमेश चौधरी व जनार्धन कदम हे सहभागी होते.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे