मुंडे-मेटे जवळ अन्‌ राष्ट्रवादीत कुरघोड्या 

दत्ता देशमुख - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 मार्च 2017

बीड - पंकजा मुंडे आणि विनायक मेटेंतील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार, यातून मुंबईत दोघांची झालेली बैठक, राष्ट्रवादीत पदासाठी सुरू असलेली ओढाताण आदी बाबी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपलाही सत्तास्थापनेची संधी मिळू शकते. 

बीड - पंकजा मुंडे आणि विनायक मेटेंतील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार, यातून मुंबईत दोघांची झालेली बैठक, राष्ट्रवादीत पदासाठी सुरू असलेली ओढाताण आदी बाबी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपलाही सत्तास्थापनेची संधी मिळू शकते. 

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 25 आणि एक पुरस्कृत सदस्य आहे. सत्तेसाठी 31 सदस्य जुळवण्यासाठी त्यांना काकू-नाना आघाडी आणि कॉंग्रेसचे तिघे राष्ट्रवादीसोबत येण्याची गरज आहे; पण राष्ट्रवादीत आतापासूनच जिल्हा परिषदेच्या भावी सत्तेवरील नियंत्रण, पदासाठी कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. सत्तेच्या सारीपाटात आघाडीला सोबत घेण्यात जयदत्त क्षीरसागर यांची "ना' असून, कॉंग्रेसच्या वाट्याला येणारे पद "मलाच' असा दावा तिघांकडूनही केला जात आहे. राष्ट्रवादीतल्या या "ड्रॉबॅक'चा फायदा उचलण्याची खेळी भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी विनायक मेटेंसोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. दोघांमध्ये मंगळवारी (ता. 28) मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहावर बैठकही झाली. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येणार असेल तर सोबत राहण्याचा शब्द मेटेंनी दिल्याची माहिती आहे. 

राष्ट्रवादीच्या कमकुवत बाजू 
राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले 25 सदस्य आहेत, तर तिघे कॉंग्रेसचे आणि तिघे संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीचे आहेत. त्यामुळे सत्तास्थापेनासाठी राष्ट्रवादीला या दोघांचीही गरज आहे; पण संदीप क्षीरसागर यांना सोबतीला घेणे जयदत्त क्षीरसागर यांना रुचणारे नाही. तर कॉंग्रेसच्या आशा दौंड आणि प्रदीप मुंडे राष्ट्रवादीसोबत आघाडीत तर राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादीच्या विरोधात लढून विजयी झाले आहेत. दौंड आणि मुंडे राष्ट्रवादीमुळे विजयी झाले असे राष्ट्रवादीचे म्हणणे असून आमच्यामुळेच परळीत राष्ट्रवादीला यश मिळाल्याचा त्यांचा दावा आहे; तर आपण राष्ट्रवादीच्या विरोधात लढूनही ताकदीमुळे आलो आहोत. त्यामुळे कॉंग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या पदावर तिघांकडूनही दावा होत आहे. ज्यांना सोबतीला घ्यायचे, त्यांच्याच अडचणी असून अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरूनही पक्षात आता कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. 

त्यातच राष्ट्रवादीत सर्वाधिक नऊ सदस्य प्रकाश सोळंकेंनी निवडून आणल्याने अध्यक्षपदावर त्यांच्या पत्नी मंगला सोळंके यांचा दावा आहे; पण जिल्हा परिषदेवरील भावी सत्तेवर आपला अंकुश असावा यासाठी धनंजय मुंडे यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी गटनोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. गटनेताही आपल्या गटाचा असावा अशी त्यांची खेळी असली तरी पक्षातील काही नेत्यांना ही बाब रुचलेली दिसत नाही. तर कोणत्याही परिस्थितीत काकू-नाना आघाडीचा सत्तेत सहभाग नसावा यासाठी जयदत्त क्षीरसागर यांचे प्रयत्न आहेत. या सर्व राष्ट्रवादीच्या कमकुवत बाजू आहेत. 

अशी आहे भाजपला संधी 
पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरत पहिल्या टप्प्यात पंकजा मुंडेंनी विनायक मेटेंची जुळवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. भाजपचे 19 आणि एक अपक्ष, तर मेटेंच्या शिवसंग्रामचे चार सदस्य असे 24 वर संख्याबळ जाते. त्यातच राष्ट्रवादीतल्या कुरघोड्यातून एक अपक्ष गळाला लागू शकतो, तर एखाद दुसरा सदस्य अध्यक्ष निवडीच्या बैठकीवेळी गैरहजरही राहू शकतो. शिवाय कॉंग्रेसमध्ये आपणच पदाचे दावेदार अशी तिघांचीही मानसिकता असल्याने यातूनही काही तरी भाजपच्या हाती लागू शकते. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एखादे पद हाती आले तरी आगामी विधानसभेची तयारी अधिक चांगली होईल म्हणून बदामराव पंडितही शिवसेनेचे चार सदस्य भाजपला देऊ शकतात.

Web Title: Mundhe - Mete politics