अरेरेऽऽऽ पूरग्रस्तांसाठीही नाहीत महापालिकेकडे पैसे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 August 2019

पूरग्रस्तांसाठी घोषणा केलेले 16 लाख रुपये देण्यासही पैसा नसल्याचे मंगळवारी समोर
आले.

औरंगाबाद - अत्यल्प वसुली व अफाट खर्च यामुळे महापालिका डबघाईला आली असून, पूरग्रस्तांसाठी घोषणा केलेले 16 लाख रुपये देण्यासही पैसा नसल्याचे मंगळवारी (ता. 27) समोर आले. मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी पैसे देण्यास नकार देताच, महापौरांनी त्यांची कानउघाडणी केली. 16 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे देण्याची घोषणा महापौरांनी केली होती; मात्र प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे महापौरांना तोंडघशी पडावे लागले. 

सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना महापालिकेने 16 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. त्यात पदाधिकारी, नगरसेवकांचे पाच लाखांचे मानधन, तर
अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे 11 लाखांचे वेतनाचा समावेश होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (ता. 27) शहरात येणार असल्यामुळे हा निधी त्यांच्याकडे दिला जाईल, असे महापौरांनी घोषित केले; मात्र मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी पैसे नसल्यामुळे निधी देण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर महापौरांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शेवटी एक सप्टेंबरला हा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal budget collapses