बाप रे ! दोन मानवी सांगाड्याप्रकरणी आठ वर्षानंतर कुरुंदा ठाण्यात खूनाचा गुन्हा 

प्रभाकर बारसे
Thursday, 18 February 2021

या तपासामध्ये गावातील साईनाथ पुंजाजी इंगोले (वय २५) हे बेपत्ता असल्याने एक मृतदेह साईनाथ इंगोले यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

गिरगाव ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पाण्याच्या टाकीत सापडेलल्या दोन सांगाड्यांची हाडे फ्रॅक्चर असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आठ वर्षानंतर अज्ञात व्यक्तीविरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १८) खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही सांगाड्यापैकी एक सांगाडा पुरुषाचा तर दुसरा सांगाडा हा महिलेचा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या वापरात नसलेल्या पाण्याच्या रिकाम्या टाकीजवळ ता. १४ नोव्हेंबर २०१२ रोजी टाकीत दोन मानवी सांगाडे आढळून आले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. 

या तपासामध्ये गावातील साईनाथ पुंजाजी इंगोले (वय २५) हे बेपत्ता असल्याने एक मृतदेह साईनाथ इंगोले यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसरा मृतदेह ओळखण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांनी सांगाड्याचे काही नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यानंतर एक सांगाडा पुरुषाचा तर एक सांगाडा महिलेचा असून दोन्ही सांगाड्याची काही हाडे फॅक्चर असल्याचा अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गावांतूनच काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. प्राप्त अहवालानुसार कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी गुरुवारी (ता. १८) फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. 

यात साईनाथ इंगोले व एका महिलेस मारहाण करुन त्यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे नमुद केले आहे. मयत साईनाथ इंगोले यांच्या कवटीला व फासळीला फॅक्चर करुन खांद्यावर मारुन त्यांचे हाड फॅक्चर झाले होते. तर महिलेच्या खांद्यावर मारुन तीचे हाड फॅक्चर केल्याचे तक्रारीत नमुद आहे. असा वैद्यकीय अहवाल व  वरिष्ठांच्या आदेशावरुन पोलिसांनी  अज्ञात व्यक्तीविरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक वसीम हाश्मी, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गोपीनवार यांनी तपास सुरु केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder case in Kurunda police station after eight years in two human skeletons case hingoli news