क्राईम सिरियल पाहून जुन्या प्रियकराने काढला काटा 

उमेश वाघमारे 
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

जालना - एकासोबत गुपचूप लग्न केल्याचे समजताच पित्त खवळलेल्या जुन्या प्रियकराने क्राईम सिरियल पाहून युवतीचा काटा काढला. एखाद्या क्राईम सिरीयलप्रमाणे गुंतागुंत वाढलेल्या शहरातील दीपाली शेंडगे खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे.

जालना - एकासोबत गुपचूप लग्न केल्याचे समजताच पित्त खवळलेल्या जुन्या प्रियकराने क्राईम सिरियल पाहून युवतीचा काटा काढला. एखाद्या क्राईम सिरीयलप्रमाणे गुंतागुंत वाढलेल्या शहरातील दीपाली शेंडगे खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. त्यात ही बाब पुढे आली. दरम्यान, संशयित विवाहित प्रियकराला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. 

चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीव्ही सेंटर परिसरातील रेल्वेरुळाच्या बाजूला शनिवारी (ता. 21) सायंकाळी म्हाडा कॉलनी येथील दीपाली रमेश शेंडगे या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळावर मोपेड, कॉलेज बॅग, मोबाईल मिळून आला होता. हा नेमका अपघात की घातपात? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. प्रारंभी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र नातेवाइकांच्या रेट्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : धुळीने माखलंया...

नातेवाइकांच्या संशयावरून पोलिसांनी संशयित अविनाश वंजारे याला परतूर येथून अटक केली होती; मात्र या खुनात दुसऱ्याचा हात असल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार दीपाली शेंडगे हिचा पूर्वीचा प्रियकर संशयित सचिन प्रकाश गायकवाड (वय 27 रा. म्हाडा कॉलनी, जालना) याला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली असून त्यानेच हा खून केल्याचे पोलिस तपासामध्ये पुढे आले आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे, पोलिस उपनिरीक्षक सुनील इंगळे, प्रमोद बोंडले, कर्मचारी अनिल काळे, अजय फोके, गोविंद पवार, श्रद्धा गायकवाड यांनी केली. 

हेही वाचा : जालन्यात पुन्हा गावठी पिस्तूल

विवाह ठेवला लपवून 
दीपाली शेंडगे हिने परतूर येथील अविनाश वंजारे याच्यासोबत तीन ते चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता; मात्र हा प्रेमविवाह सर्वांपासून या दोघांनी लपविली होता. दीपालीचा विवाह झाल्याचे पुढे आल्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी पहिला संशयित म्हणून अविनाश वंजारे याला पकडले; मात्र तरीदेखील खुनाचे नेमके कारण पुढे येत नव्हते. 

जुन्या प्रियकराने केला खून 
दीपाली शेंडगे व संशयित सचिन (वय 27) याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच कारणामुळे सचिनची पत्नी त्याला सोडून गेली. दरम्यान, सचिन गायकवाड याने दीपालीला शनिवारी (ता. 21) अंबड चौफुली येथे आईस्क्रीम खाण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर तिला इंदेवाडी येथील मित्राच्या घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी दीपालीने त्याला आपला विवाह झाल्याचे सांगितले. त्यामुळे पित्त खवळलेल्या सचिनने संतापाच्या भरात दीपालीचा डोक्‍यात मारून तिचा खून केला. त्यानंतर अंधार पडल्यावर तिचा मृतदेह ओढणीने आपल्या पाठीमागे बांधून मोपेडवरून रेल्वेरुळापर्यंत आणला. तेथे रेल्वेरुळाच्या बाजूला मृतदेह टाकत आत्महत्येचा बनाव केला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा : बेपत्तांचा लागेना पोलिसांना पत्ता

नातेवाइकांना पाठविली सुसाईड नोट 
सचिनने दीपालीचा मृतदेह रेल्वेपटरीच्या बाजूला टाकल्यानंतर तिच्या मोबाईलवरून काही नातेवाइकांना फोटो; तसेच सुसाईड नोट पाठविली. ज्यामध्ये अविनाश वंजारे याच्यामुळे सुसाईड करीत असल्याचे नमूद होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

क्राईम सिरीयलमधील घटनाक्रम प्रत्यक्षात 
अपघाताचा बनाव करून पोलिसांचा तपास वेगळ्या दिशेने वळविण्याचा एक घटनाक्रम सचिनने एका क्राईम सिरीयलमध्ये पाहिला होता. दीपाली शेंडगे हिचा खून केल्यानंतर हा घटनाक्रम त्याने प्रत्यक्षात आणला हे विशेष. दरम्यान, सचिनला न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a young woman in jalna