esakal | माझं गाव आता दुष्काळमुक्त होतंय...
sakal

बोलून बातमी शोधा

देवडी (ता. वडवणी, जि. बीड) : "सकाळ रिलीफ फंडा'तून गेटविरहित उभारलेला जिल्ह्यातील सर्वांत मोठा बंधारा.

"सकाळ रिलीफ फंड'मधून उभारलेल्या बीड जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गेटविरहित सिमेंट बंधाऱ्यामुळे देवडी (ता. वडवणी) गावाची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू झालीय. बंधारा तुडुंब भरल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदाेत्सव साजरा केला तसेच साेशल मीडियावर माझं गाव आता दुष्काळमुक्त हाेतंय, अशी टॅगलाईन वापरून बंधाऱ्यावर घेतलेली सेल्फीही शेअर केलीय...

माझं गाव आता दुष्काळमुक्त होतंय...

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड - "गंगा आली हो अंगणी...', "मी आज खूश आहे. कारण माझं गाव आता दुष्काळमुक्त होतंय...' अशा पोस्ट सध्या बीड जिल्ह्यातील देवडी (ता. वडवणी) येथील ग्रामस्थ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करीत आहेत. यामागचं कारणही तसंच आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या गावात "सकाळ रिलीफ फंड'मधून जिल्ह्यातील सर्वांत मोठा गेटविरहित बंधारा उभारण्यात आलाय आणि हा बंधारा शनिवारच्या (ता. 31) पावसाने तुडुंब भरलाय. 

मला व्यक्तिश: या कामामुळे आनंद झाला आहे. दुष्काळमुक्तीसाठी कायम पुढाकार घेणाऱ्या "सकाळ'ने केलेल्या अभिनव उपक्रमाचे फळ या पावसामुळे दिसू लागले आहे. 
- आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी, बीड. 

कायम दुष्काळाने होरपळणाऱ्या देवडीकरांच्या (ता. वडवणी, जि. बीड) नशिबीही दुष्काळ कायम पाचवीला पुजलेला. गावात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही कायम "आ'वासून उभा राहिलेला. गावचे भूमिपुत्र आणि पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त दिलीपराव देशमुख यांनी "सकाळ रिलीफ फंड'मधून बंधारा उभारणीसह नदीचे विस्तारीकरण करण्याची मागणी केली. उन्हाळ्यात काम सुरू करून जिल्ह्यातील सर्वांत मोठा गेट नसलेला सिमेंट बंधारा उभा राहिला आणि साधारण एक किलोमीटर अंतराच्या नदीचे विस्तारीकरण केले. या नदीवरील एका बंधाऱ्याचेही पुनरुज्जीवन झाले. साधारण 92 हजार क्‍युबिक मीटर गाळ काढला गेला.

"सकाळ रिलीफ फंड'मधून माझ्या गावात भव्य बंधारा उभारून नदीचे विस्तारीकरण केले. यामुळे माझे गाव दुष्काळमुक्त होणार असल्याचा आनंद आहे. त्यामुळे "सकाळ माध्यम समूहा'चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. 
- दिलीपराव देशमुख, 
धर्मादाय सहआयुक्त, पुणे.

कायम दुष्काळी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्‍यावर वरुणराजाने अधिकच डोळे वटारलेले होते; परंतु मागील तीन दिवस नियमित पाऊस झाला. शनिवारच्या पावसानंतर बंधाऱ्यात पाणी साचले आणि ग्रामस्थांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. पाणी साचलेल्या बंधाऱ्यावर उभे राहून तरुणांसह वृद्धांनीही सेल्फी घेतली. काहींनी मुलाबाळांसह येऊन फोटोसेशन केले. "गंगा आली हो अंगणी', "मी आज खूश आहे. कारण माझं गाव आता दुष्काळमुक्त होतंय' अशा टॅगलाइनसह बंधाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. 

खरंच आज गंगा अंगणी आली म्हटलं, तर चुकीचे ठरणार नाही. केवढं मोठं काम आहे. याचा विहिरी, बारवांना तर फायदा होणारच आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न सुटणार आहे. 
- तुळशीराम राऊत, 
शेतकरी, देवडी (ता. वडवणी, जि. बीड) 

 

जिल्ह्यातील सर्वांत मोठा सिमेंट बंधारा 
आतापर्यंत शासकीय यंत्रणेनेही उभारलेल्या बंधाऱ्यांपेक्षा "सकाळ रिलीफ फंड'मधून देवडी (ता. वडवणी) येथे उभारलेला हा बीड जिल्ह्यातील गेट नसलेला सर्वांत मोठा सिमेंट बंधारा असल्याचे धारूरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी सतीश देशपांडे म्हणाले. दोन्ही भिंतींसह 84 मीटर लांबी आणि पावणेतीन मीटर रुंदी असलेल्या बंधाऱ्याची "सकाळ रिलीफ फंड'मधून उभारणी झाली आहे. साधारण एक किलोमीटर अंतराचे नदी विस्तारीकरण आणि एका बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन झालेय. त्यामुळे साधारण साडेसात ते आठ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता झाली आहे. यामुळे दोन किलोमीटर परीघ क्षेत्रातील विहिरी व विंधनविहिरींना याचा फायदा होणार आहे. 

"सकाळ'चा पुढाकार; ग्रामस्थ, प्रशासनही सकारात्मक 
"सकाळ रिलीफ फंड'मधून काम हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांची बैठक घेतली. ग्रामस्थांनीही सकारात्मकता दाखविली. जिल्हा जलसंधारण अधिकारी व्ही. बी. गालफाडे यांनी धारूरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी सतीश देशपांडे आणि सहायक अभियंता संजय खंदाट यांच्यामार्फत कायम तांत्रिक मार्गदर्शन आणि कामाची निगराणी केली. त्यामुळे हे भव्य काम उभारले. 
 


"सकाळ रिलीफ फंड'मुळे आमच्या गावाचा दुष्काळ कायमचा मिटणार आहे. बंधाऱ्यात पाणी साचल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 
- बाबासाहेब झाटे, 
ग्रामस्थ, देवडी (ता. वडवणी, जि. बीड)  

loading image
go to top